बारामती : स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपरिषद व रिइकोरन प्रायव्हेट लिमिटेड, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मानवी केसांचा कचरा संकलन करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम बारामती शहरात हाती घेतला आहे; नाभिक बांधवांनी मानवी केसाचा कचरा घंटागाडीमध्ये न टाकता नगरपरिषदेच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहनात टाकावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.

सिनेमा रोड येथे आयोजित मानवी केसांच्या कचरा संकलन उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी माहिती दिली. नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच नाभिक संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

नगरपरिषद हद्दीतील सर्व नाभिक दुकान व ब्युटी पार्लरमधील केसाचा कचरा वाहनामार्फत संकलित केला जाणार आहे. सदर केसांच्या कचऱ्यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने यामधून नैसर्गिक चांगल्या प्रतीचे लिक्विफाइड खत तयार होते व या खताला कृषी क्षेत्रातून चांगली मागणी आहे. शहरात मानवी केसांच्या कचऱ्याचे संकलन दर पंधरा दिवसाला केले जाणार असून जागेवरच वजन करून दुकानदारांना प्रति किलो दहा रुपये यादराने पैसे संबंधित कंपनीमार्फत अदा करण्यात येणार आहेत.

शहरातील ड्रेनेज लाईनमध्ये केस अडकल्यामुळे ड्रेनेजमधील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो.तसेच मानवी केस जाळल्यामुळे त्यातून अमोनिया, कार्बोनिल, सल्फाईड ,हायड्रोजन सल्फाइड सल्फर डायऑक्साइड ,फिनॉक्स, नायट्रिक्स, पायरोल्स, आणि पायरीडाइन यासारखे दुर्गंधी पसरतात तसेच विषाणू निर्माण होतात. या सर्वबाबी सजीव प्राण्यासाठी खूप हानिकारक आहेत यामुळे नागरिकांना श्वसनाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासर्व बाबींचा विचार करता यामुळे मानवी केसांच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासोबतच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. रोकडे यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा