माळेगाव बारामती: पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील अंजनगाव ता. बारामती जि.पुणे या गावातील श्री.संतोष कदम यांचा इयत्ता ३ री मध्ये शिक्षण घेत असलेला मुलगा श्रेयश संतोष कदम वय ९ वर्ष, हा दिनांक २६/११ /२०२४ रोजी दुपारी १२.०० वा. चे सुमारास त्याचे आईस मी माझे कडील २ रुपयाचे किराणा दुकानातून काहीतरी खायला घेऊन येतो असे सांगून निघून गेलेला होता, परंतु बराच वेळ झाल्यानंतर देखील तो घरी न परतल्यामुळे त्याची आई व बहीण तसेच इतर नातेवाईकांनी त्याचा अंजनगाव या गावात तसेच परिसरात शोध घेऊन देखील तो सापडला नाही म्हणून श्रेयस याचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केलेबाबतची फिर्याद श्रेयस याची आई सौ पुनम संतोष कदम यांनी माळेगाव पोलीस ठाणे येथे दिली होती.व त्या प्रमाणे गुन्हा देखील दाखल केलेला आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी जबाबात नमूद घटनेचे गांभीर्य ओळखून सहा.पोलीस निरीक्षक श्री सचिन लोखंडे प्रभारी अधिकारी, माळेगाव पोलीस ठाणे यांनी सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल खटावकर यांच्याकडे देऊन तात्काळ अपहृत मुलगा श्रेयस याचा शोध घेण्यासाठी चार वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांना श्रेयस याचा शोध घेण्यासाठी रवाना केले तसेच घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे सदर मुलाचा शोध पणदरे तालुका बारामती परिसरात घेण्यात आला व त्यात माळेगाव पोलिसांना यश आले.
शालेय मुलगा श्रेयस यास त्याचे आई-वडील यांच्या ताब्यात सुखरूप परत देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा श्री पंकज देशमुख सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा श्री गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा डॉ श्री सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक श्री.सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल खटावकर, श्री.देविदास साळवे, श्री तुषार भोर, पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, अमोल राऊत, नितीन कांबळे, गणेश खंडागळे, नंदकुमार गव्हाणे, धीरज कांबळे, महिला पोलीस अंमलदार सुनिता पाटील यांनी केलेली आहे.
केलेल्या कामगिरी बाबत माळेगाव पोलीस ठाण्याविषयी एक सकारात्मक भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा