पुणे, : येणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान सर्व संबंधित बाबींसाठी निवडणूक विभागाने नेमलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करुन निवडणुक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह सर्व संबंधित समन्वय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. दिवसे यांनी मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा, दिव्यांगांना उपलब्ध करुन द्यावयाच्या सोयीसुविधा, व्हीलचेअर, ज्यांना हालचाल शक्य नाही अशा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरुन मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत करावयाची व्यवस्था उत्तम पद्धतीने ठेवावी, अशा सूचना दिल्या.

विविध विषयांशी सबंधित यंत्रणांचे प्रशिक्षण, मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापन, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजन, टपाली मतदान, संपर्क आराखडा, मतदार संघांना मतदान यंत्रांचे वाटप, संशयास्पद बँक व्यवहारावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था या अनुषंगाने सूचना देऊन भरारी पथके (एफएसटी) स्थापन करण्याबाबतचे आदेश तात्काळ काढावेत, तसेच
ग्रामीण भागातील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग अर्थात स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. शहरात महापालिकांनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत. सहकार विभागाशी समन्वयाने सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान जागृती करावी, असेही ते म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा