Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

‘ऑपरेशन ट्रॅप’ फत्ते! १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई; सराईत साखळी चोराला ठोकल्या बेड्या

0 8 3 8 2 7

शिक्रापूर : १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई करत सराईत साखळी चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पळून जाणाऱ्या आरोपीचा ३ ते ४ किलोमीटर पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. वारंवार ठिकाण बदलणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये तळ ठोकून पकडले.

सविस्तर वृत्त असे की, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चैन स्नॅचिंग (साखळी चोरी) टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात शिक्रापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. ३० जून रोजी सायंकाळी डिंग्रजवाडी येथे वैशाली विकास गव्हाणे या आपल्या मुलासह ज्युपिटर दुचाकीवरून घरी जात असताना विनानंबरच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले आणि त्यांना दुचाकीवरून खाली पाडून पोबारा केला होता. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर आणि त्यांच्या पथकाने कोरेगाव भीमा ते अहिल्यानगरपर्यंतचा परिसर पिंजून काढत १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी सराईत असल्याने तो वारंवार पोलिसांना गुंगारा देत होता, त्यामुळे पोलिसांनी थेट अहिल्यानगर जिल्ह्यात तळ ठोकून खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले. प्रशांत उर्फ वरून घुमीर चव्हाण (वय २५, रा. चिंचोडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने धूम ठोकली, मात्र पोलिसांनी हार न मानता सलग ३ ते साडेतीन किलोमीटर त्याचा थरारक पाठलाग करून त्याला जेरबंद केले.

या कारवाईत आरोपीने शिक्रापूर आणि शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका चैनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून ३ तोळ्यांचे दोन सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली युनिकॉर्न दुचाकी असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध यापूर्वी मालमत्तेविरुद्धचे ५ गंभीर गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे आणि टोळीतील इतर दोन फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नवनाथ नाईकडे तसेच पोलिस कॉन्स्टेबल नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचीत यांच्या पथकाने बजावली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे