Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीचा सुपुत्र अथर्व पवार देशात ३२ वा, युपीएससी परीक्षेत घवघवीत यश,  पहिल्याच प्रयत्नात ‘सेंट्रल डीवायएसपी’ पदी निवड

0 8 2 9 3 2

बारामती : येथील सायली हिल येथे राहणाऱ्या अथर्व सुनीता प्रदीप पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) सीएपीएफ (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. अथर्वने संपूर्ण भारतातून ३२ वा क्रमांक पटकावत पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक कमांडंट (वर्ग १) या पदावर आपली मोहोर उमटवली आहे. हे पद युपीएससी द्वारे थेट भरले जाणारे ग्रुप-ए गॅझेटेड अधिकारी दर्जाचे असून त्याची तुलना केंद्रीय पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) किंवा लष्करातील “कॅप्टन” या पदाशी केली जाते.

अथर्वचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर येथे झाले. त्यानंतर त्याने पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी (बीई मेकॅनिकल) पूर्ण केली. खरंतर अनेक विद्यार्थी यांत्रिक अभियांत्रिकीसारखे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर खाजगी क्षेत्रातील करिअरला प्राधान्य देतात. मात्र, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच अथर्वने देशसेवेचे मार्ग निवडला आणि भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमीच्या जोरावर तयारी सुरू केली.

 

या यशामागे अथर्वची जिद्द आणि कठोर मेहनत आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीसारख्या मोठ्या शहरात न जाता त्याने बारामतीमध्ये घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीने आपला अभ्यास केला. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी न जाता, अभ्यासावरील लक्ष विचलित होणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी त्याने स्मार्टफोनऐवजी चक्क साध्या बटनच्या फोनचा वापर केला. केवळ पुस्तकी अभ्यासात न अडकता त्याने शारीरिक तंदुरुस्तीलाही महत्त्व दिले. दररोज व्यायाम करून त्याने अभ्यासातील एकाग्रता आणि ऊर्जा टिकवून ठेवली.

अथर्वच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील, सुनीता आणि प्रदीप पवार यांचे भक्कम पाठबळ आणि संस्कार महत्त्वाचे ठरले आहेत. त्याची आई सुनीता पवार या बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या डॉ. सायरस पूनावाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर वडील प्रदीप पवार हे पियाजिओ कंपनीत उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते, सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अथर्वच्या ध्येयाला सातत्याने प्रोत्साहन दिले. घरून अभ्यासाचे कोणतेही दडपण न टाकता त्याला हव्या त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मिळालेला कुटुंबाचा पाठिंबा त्याच्यासाठी मोलाचा ठरला.

पहिल्याच प्रयत्नात हे मोठे यश मिळवूनही अथर्वचे आयएएस अधिकारी होण्याचे मुख्य स्वप्न आहे. त्याचे असिस्टंट कमांडंट पदाचे प्रशिक्षण हैदराबाद येथे सुरू होण्यास अजून काही महिने बाकी असून, तोपर्यंत आयएएस पदासाठीचा आपला अभ्यास तो असाच सुरू ठेवणार आहे. ध्येय निश्चित करून सातत्याने अभ्यास केल्यास आणि संयम बाळगल्यास घरून अभ्यास करूनही कोणतेही मोठे यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश त्याने तरुणांना दिला आहे. अथर्वच्या या यशाबद्दल बारामतीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्याचे मोठे कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे