अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया
खाकी वर्दीचा ‘तमाशा’ अन् व्यवस्थेचा बळी? यवत पोलिस निरीक्षकांच्या ‘हुकूमशाही’पायी पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःलाच वाहिली ‘भावपूर्ण श्रद्धांजली’!

0
3
9
4
5
7
पुणे ग्रामीण दलात खळबळ: “माझा नवरा परत द्या, अन्यथा…”
पत्नीचा पोलीस ठाण्यात आक्रोश; ४ पथके शोधासाठी रवाना
बारामती : “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यावर वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून स्वतःच्याच मृत्यूची ‘श्रद्धांजली’ वाहण्याची वेळ यावी, यासारखी दुसरी दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट नाही.
यवत पोलीस ठाण्याचे वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे चर्चेत आलेले पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या ‘मोगलाई’ कारभाराला कंटाळून पोलीस नाईक निखिल रणदिवे हे संशयास्पदरित्या बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वाभाडे निघाले असून, “माझ्या पतीला सुखरूप हजर करा,” या मागणीसाठी रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी यवत पोलीस ठाण्यात अक्षरशः तांडव घातले.
काय आहे नेमके प्रकरण? खाकीतील ‘अंतर्गत’ संघर्ष
यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या केडगाव पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे (रा. शिक्रापूर) हे अचानक बेपत्ता झाले. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला स्वतःचा फोटो लावून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे लिहित, “वरिष्ठांचा जाच, कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष आणि मुलीचा वाढदिवस साजरा न करता आल्याने मी हे पाऊल उचलत आहे,” असा स्फोटक मजकूर लिहिला.
एका जिवंत पोलीस कर्मचाऱ्याने व्यवस्थेला कंटाळून स्वतःचेच ‘श्राद्ध’ घातल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद हिरावला!
पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देतात, साप्ताहिक सुट्ट्या नाकारतात आणि कामाचा अवाजवी बोजा टाकतात, असा गंभीर आरोप रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. निखिल यांच्या चिमुरडीचा पहिलाच वाढदिवस होता. या आनंदाच्या क्षणी लेकीजवळ राहण्यासाठी त्यांनी रीतसर सुट्टी मागितली, मात्र ती देखील निरीक्षकांनी निर्दयपणे फेटाळली. पित्याच्या भावनांचा असा चुराडा झाल्यानेच निखिल रणदिवे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
यवत ठाण्यात पत्नीचा आक्रोश: “साहेब, सुट्ट्यांचे नियम फक्त कागदावरच का?”
पती बेपत्ता झाल्याचे कळताच निखिल यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी शनिवारी थेट यवत पोलीस ठाणे गाठले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) बापूराव दडस समोर येताच अक्षदा यांचा संयम सुटला. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला, “माझे पती महिनाभरापासून तणावात होते. त्यांना हक्काची साप्ताहिक सुट्टी का दिली नाही? देशमुख साहेबांचा एवढा त्रास का? आता मला काहीही ऐकायचे नाही, मला माझे पती सुखरूप पाहिजे आहेत.” त्यांच्या या प्रश्नांनी उपस्थित अधिकाऱ्यांनाही निरुत्तर केले.
४ पथके रवाना, पण शोध शून्य!
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आणि मीडियाचा दबाव वाढल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. रणदिवे यांच्या शोधासाठी ४ विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. मात्र, घटनेला काही तासांहून अधिक काळ उलटूनही पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. दुसरीकडे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी कोणालाही त्रास दिला नाही,” असा पवित्रा त्यांनी घेतला असला, तरी कर्मचाऱ्याने थेट नाव घेऊन स्टेटस का ठेवले? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.
वरिष्ठांची पाठराखण की निष्पक्ष चौकशी?
या गंभीर प्रकरणी DySP बापूराव दडस यांनी सारवासारव करत, “रणदिवे यांनी यापूर्वी कधीही तक्रार केली नव्हती. सुट्टीवर असतानाच ते बेपत्ता झाले आहेत. ते सापडल्यानंतर त्यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करून अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला जाईल,” असे सांगितले. मात्र, जोपर्यंत निखिल रणदिवे समोर येत नाहीत आणि सत्य सांगत नाहीत, तोपर्यंत यवत पोलीस ठाण्यातील ‘खाकी’ प्रतिमेला लागलेला हा डाग पुसला जाणार नाही.
प्रश्न जनतेचा:
गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांवरच जर स्वतःचे सहकारी शोधण्याची वेळ येत असेल आणि पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असेल, तर सामान्य जनतेला न्याय कोण देणार? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.







