गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
“रात्रीच्या अंधारात गोठ्यावर डल्ला…” आणि पोलिसांचा ‘तिसरा डोळा’…” शेळ्या-बोकड चोरणारे त्रिकूट अटकेत १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

0
6
4
8
8
8
वडगाव निंबाळकर: शेतकऱ्यासाठी त्याची जनावरे हीच खरी संपत्ती असते. मात्र, याच संपत्तीवर रात्रीच्या अंधारात डल्ला मारणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना मोठे यश आले आहे. सदोबाचीवाडी परिसरात धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
सदोबाचीवाडी (ता. बारामती) गावाच्या हद्दीतील इनामवस्ती, होळ रोड येथे फिर्यादी संजय जगन्नाथ होळकर हे वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली जनावरे गोठ्यात बांधली होती. मात्र, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोठ्याची लोखंडी जाळी तोडली आणि आत प्रवेश केला. चोरट्यांनी गोठ्यातील १ शेळी आणि ४ बोकड लंपास केले. सकाळी हा प्रकार लक्षात येताच होळकर यांनी तात्काळ वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुन्हे शोध पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले आणि आपल्या खबऱ्यांचे जाळे कामाला लावले. यातून पोलिसांना काही संशयितांची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले:
१. अजय उर्फ गोविंद सतीश होळकर (रा. मोहोळ, ता. बारामती, जि. पुणे)
२. आर्यन सचिन माने (रा. निरगुडवाडी, सदोबाचीवाडी, ता. बारामती)
३. शिवभान उर्फ बंटी नंदकुमार घोडके (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती)

ताब्यात घेतलेल्या तिघांकडे पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून पोलिसांनी चोरीला गेलेली एकूण ०५ बोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या ०२ दुचाकी (मोटारसायकली) असा एकूण १,१५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची धडाकेबाज कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली,
* नागनाथ पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
* पोपट नाळे (पोलीस हवालदार व तपास अधिकारी)
* सागर चौधरी, हृदयनाथ देवकर, महेश पन्हाळे (पोलीस हवालदार)
* भाऊसाहेब मारकड (पोलीस नाईक)
* पोलीस अंमलदार: आबा जाधव, सूरज धोत्रे, विलास ओमासे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पोपट नाळे करत आहेत.





