Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

​किरकोळ वाद ठरला काळ! उदमाईवाडी यात्रेत सुट्ट्या पैशांवरून तरुणाची निर्घृण हत्या, वालचंदनगर पोलिसांकडून अवघ्या ३ तासांत आरोपी जेरबंद!

0 6 8 2 0 3

वालचंदनगर: उदमाईवाडी (ता. इंदापूर) येथील यात्रेत सुट्ट्या पैशांच्या किरकोळ वादातून एका आईस्क्रीम विक्रेत्याने दिलेल्या जोरदार धक्क्यामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वालचंद नगर पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवून अवघ्या तीन तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ पासून उद्धट, घोलपवाडी, उदमाईवाडी व पवारवाडी या चार गावांची एकत्रित उदमाईदेवी यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेसाठी परिसरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.
दिनांक १ मे २०२६ रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास मौजे उद्धट (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सूरज हिम्मत तुपे आणि त्याचा मित्र दादा रावण इंगळे (वय २३ वर्ष) हे दोघे उदमाईदेवी मंदिर परिसरात यात्रेसाठी आले होते. तिथे फिरत असताना ते दोघे फालुदा आईस्क्रीम खाण्यासाठी एका गाडीवर गेले. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर दोन्ही तरुणांकडे सुट्टे पैसे नसल्याने त्यांचा आईस्क्रीम विक्रेत्याशी वाद झाला.
या वादाचे पर्यवसान शिवीगाळीत झाले. वाद वाढत गेल्याने दादा इंगळे हा विक्रेत्याच्या गाडीवर चढला. त्यावेळी संतापलेल्या आईस्क्रीम विक्रेत्याने दादाला जोरात खाली ढकलून दिले. रस्त्यावर कोसळल्याने दादाच्या डोक्याला डांबरी रोडवर गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच बेशुद्ध पडला. हे पाहून आरोपी आईस्क्रीम विक्रेता घटनास्थळावरून पळून गेला.

बेशुद्ध पडलेल्या दादाला त्याच्या सोबतच्या मित्रांनी तात्काळ उपचारासाठी महिला शासकीय हॉस्पिटल, बारामती येथे दाखल केले. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वालचंद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे गतिमान करत दोन पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली.
पोलिसांनी घटनास्थळावरून माहिती घेतली असता आरोपी आईस्क्रीम विक्रेत्याचे नाव किसन शंकरलाल प्रजापती (सध्या रा. बरड, ता. फलटण, जि. सातारा; मूळ पत्ता: गाव हिराखेडी, ता. राशमी, जि. चितोडगड, राजस्थान) असल्याचे निष्पन्न झाले. तो मौजे बरड येथून मूळ गावी पळून जाण्याच्या तयारी असतानाच, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याला तातडीने ताब्यात घेतले आणि अटक केली.

या घटनेप्रकरणी मृत दादा इंगळेचा मित्र सुरज हिम्मत तुपे याच्या फिर्यादीवरून वालचंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३५२ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(२)(व्ही) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत.

सदरची कामगिरी ही श्री.संदीपसिंह गिल्ल,पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण, श्री.गणेश बिरादार,अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग,श्री. डॉ. सुर्दशन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार डुणगे, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, श्रेणी पोसई रतिलाल चौधर, सपोफौ नानासाहेब आटोळे, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किर्तीलाल गायकवाड, बापु मोहिते, गणेश काटकर, परिमल माणेर, अजित थोरात, किसन बेलदार व पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर, गणेश वानकर यांनी अवघ्या ३ तासांत आरोपीला पकडण्याची यशस्वी कामगिरी केली.

3/5 - (2 votes)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे