गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: दीड कोटी रुपयांचे ४४९ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

0
9
3
1
9
5
सातारा : सातारा जिल्हा पोलीस दल आणि सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाची कास धरत एक मोठी आणि कौतुकास्पद कारवाई केली आहे. नागरिकांचे चोरीला गेलेले आणि हरवलेले तब्बल दीड कोटी रुपये किमतीचे ४४९ मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते या मोबाईलचे वाटप करण्यात आले.

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा हे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण तपासणीसाठी दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्यामार्फत हरवलेले मोबाईल परत मिळविण्याची एक विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत भारत सरकारच्या सीईआयआर (CEIR – Central Equipment Identity Register) या पोर्टलचा अतिशय प्रभावीपणे वापर करण्यात आला. विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींमधील आयएमईआय (IMEI) क्रमांकाच्या आधारे तांत्रिक शोध घेण्यात आला. सन २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पोलिसांकडे एकूण १४,३०० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी तब्बल ४८४२ मोबाईल फोन याआधीच हस्तगत करून नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून आजअखेर नव्याने हस्तगत केलेले दीड कोटी रुपये किमतीचे ४४९ मोबाईल हँडसेट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात संबंधित मोबाईल धारकांना देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.




