Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणाऱ्या दोन गटांतील गुंडांना बारामती तालुका पोलिसांचा दणका; आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

0 7 9 9 8 2

बारामती : सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर भाईगिरी आणि दादागिरी करत दहशत माजविणाऱ्या दोन गटांतील गुंडांना गजाआड करून बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांतील आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रुई पाटी व गदिमा सभागृह परिसरात दोन गटांत वाद आणि हाणामारीची घटना घडली. याबाबत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पहिल्या घटनेत दादासो ज्ञानदेव डोईफोडे (वय ४२, रा. निंबोडी, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा यश आणि नैतिक दोशी हे थार गाडीने गेले असता, सनी पाटील याने त्याच्या थार गाडीसह १० ते १५ साथीदारांना बोलावून घेतले. या टोळक्याने हातात काठ्या आणि तलवारी घेऊन डोईफोडे यांच्या गाडीवर हल्ला केला. तसेच गाडीची काच उघडण्यास सांगून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर डोईफोडे हे विचारपूस करण्यासाठी गदिमा सभागृहाजवळ गेले असता सनी पाटील याने पुन्हा गाडी आडवी लावून शिवीगाळ करत तलवारीचा धाक दाखवला. याप्रकरणी सनी संतोष पाटील, रणजित खाडे आणि इतर १५ ते २० जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी भोसले करत आहेत.
तर, दुसऱ्या घटनेत सनी संतोष पाटील (वय २५, रा. रुई, ता. बारामती) याने दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार, तो गदिमा सभागृहाजवळील महिमा कॉर्नर येथे चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी यश दादासो डोईफोडे, दादासो ज्ञानदेव डोईफोडे, नैतिक दोशी, प्रेम सरगर, पुष्कर खाडे आणि इतर ७ जण त्याठिकाणी आले. त्यांनी गाडीच्या काचेवर मारत शिवीगाळ केली. प्रेम सरगर याच्या हातात लोखंडी गज आणि इतरांच्या हातात लाकडी दांडके होते. यावेळी दादासो डोईफोडे याने स्वतःकडील पिस्तूल रोखल्याचे लक्षात आल्याने सनी पाटील तेथून निघून गेला. याप्रकरणी ५ नामनिर्देशित आणि ७ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करत आहेत.
दोन थार गाड्यांमधून आलेल्या या गटांनी भररस्त्यात तलवारी, लोखंडी गज आणि पिस्तूल यांसारख्या घातक शस्त्रास्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या सर्व गुंडांच्या मुसक्या आवळून शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा आणि “खबरदार! भाईगिरी, दादागिरी कराल तर कायद्याच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा सज्जड दमही पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे