
बारामती : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत एका १९ वर्षीय तरुणाला दोन तलवारी आणि एका धारदार कोयत्यासह अटक केली आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर ‘रुई ब्रिज’ परिसरात ही कारवाई करण्यात आली. निवडणुकांच्या काळात शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना या कारवाईमुळे मोठा इशारा मिळाला आहे.
२ फेब्रुवारी रोजी बारामती तालुका पोलीस पेट्रोलिंगवर असताना, ‘एमआयडीसीकडून भवानी नगरच्या दिशेने एक तरुण बेकायदेशीर हत्यारे घेऊन जात आहे’ अशी खात्रीशीर माहिती बातमीदाराकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने रुई ब्रिजखाली सापळा रचून होंडा युनिकॉर्न दुचाकी (MH 42 BG 7377) अडवली. झडती घेतली असता, ओंकार रामचंद्र काळे (वय १९, रा. सणसर, ता. इंदापूर) याच्याकडे पांढऱ्या पिशवीत लपवलेल्या दोन तलवारी आणि एक धारदार कोयता मिळून आला.

या कारवाईनंतर बारामती विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:
“कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे किंवा धमकावताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी
“निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर आमचे बारकाईने लक्ष आहे. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही.”
गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग
“नागरिकांनी कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल.”
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपीकडून एकूण ३२,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे:
होंडा युनिकॉर्न दुचाकी: ३०,००० रु.
पितळी मुठ असलेली तलवार (६७ सेमी): १,५०० रु.
लोखंडी तलवार (४५ सेमी): ५०० रु.
लोखंडी धारदार कोयता: ३०० रु.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम आणि पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, मनोज पवार, अवधूत शिंदे, भारत खारतोडे व दादा दराडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
आरोपी ओंकार काळे याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा