Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माळेगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई; आयटीआय परिसरातील पानटपऱ्यांसह अवैध दारूधंद्यांवर कारवाई

0 8 7 7 7 9

माळेगाव (बारामती) : माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि अवैध दारूधंद्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत माळेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) १०० मीटर परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर, तसेच माळेगाव, पणदरे व कऱ्हावागाज येथील अवैध दारूधंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी असतानाही, आयटीआय जवळ असलेल्या ‘मैत्री पानटपरी’ आणि ‘मधुबन पानटपरी’ येथे तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळून आले. याप्रकरणी बाळकृष्ण सर्जेराव अवघडे आणि विजय कांतीलाल यादव (दोघे रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याविरुद्ध कोटपा (COTPA) कायदा २००३ मधील कलम ६(ब) आणि संबंधित शिक्षेच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईसोबतच पोलिसांनी माळेगाव, पणदरे आणि कऱ्हावागाज या गावांमध्ये अवैध दारूधंद्यांविरोधात धडक मोहीम राबवून एकूण ४ मोठ्या कारवाया केल्या आहेत. अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने व कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

सदरची कारवाई माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार अमर थोरात, विजय वाघमोडे, अजय अवघडे, महेश पठारे, तसेच पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मोरे, सागर पवार व नंदकुमार गव्हाणे यांच्या पथकाने केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन 

शैक्षणिक संस्थांच्या परिसरात कुठेही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अथवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास, तसेच अवैध दारूधंद्यांची कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन माळेगाव पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) यांच्याकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे