बारामती : बारामती-भिगवण रोडवरील सावळ गावच्या हद्दीत असलेल्या शिवन्या लॉजवर सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बोगस ग्राहक पाठवून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून, लॉज मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी हॉटेल मॅनेजर आदित्य पांडुरंग पवार (वय २२, रा. प्राथमिक शाळेजवळ, वंजारवाडी, ता. बारामती), साफसफाई कामगार महंमद नजीर शेख (वय ५४, सध्या रा. शिवन्या लॉज, सावळ; मूळ रा. जुन्या बस डेपोमागे, धाराशिव/उस्मानाबाद) आणि लॉज मालक निलेश मच्छिंद्र शिंदे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी बारामती तालुका पोलिसांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सावळ येथील शिवन्या लॉजमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ एका बोगस ग्राहकाला लॉजवर पाठवले. खात्री पटताच पोलिसांनी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास लॉजवर छापा टाकला. यावेळी मॅनेजर आदित्य पवार आणि कामगार महंमद शेख हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता, लॉज मालक निलेश शिंदे याच्या सांगण्यावरून महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका करत असल्याचे उघड झाले. या कारवाईत पश्चिम बंगाल (कोलकाता) येथील २६ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजीव वसंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) पहाटे १.३९ वाजता तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस हवालदार दणाणे यांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा