Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

निधीअभावी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणेची सेवा ५ जुलैपासून ठप्प होणार

0 7 5 0 7 7

पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांना आणीबाणीच्या प्रसंगी जसे की आग, चोरी, अपघात किंवा आजारपण या वेळी त्वरित मदत मिळण्यासाठी आणि गावच्या सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही एक अत्यंत प्रभावी स्वयंचलित संपर्क प्रणाली आहे. या यंत्रणेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संकटकाळात मदतीसाठी १८०० २७० ३६०० हा संपूर्ण भारतासाठी एकच टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहे. आपत्तीच्या वेळी यंत्रणेत नोंदणीकृत असलेला कोणताही नागरिक या क्रमांकावर कॉल करून संपूर्ण गावाला एकाच वेळी अलर्ट करू शकतो. कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या आवाजात घटनेचे स्वरूप आणि ठिकाण गावकऱ्यांना ऑडिओ कॉलद्वारे स्वयंचलित पद्धतीने समजते. तसेच, ही प्रणाली गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अफवांना आळा घालण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गावच्या सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने गावात ही यंत्रणा कार्यान्वित करावी लागते. अधिक माहितीसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येतो.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ११९६ ग्रामपंचायत हद्दीत विविध शासकीय योजनांची माहिती, ग्रामसभेची वेळ, पाणीपुरवठ्याबाबतच्या सूचना, घरपट्टी व पाणीपट्टी भरणा, वन्य प्राण्यांचे हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती याबाबत नागरिकांना सूचना देण्यासाठी ही यंत्रणा फेब्रुवारी २०१९ मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत एका कॉलच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना सावध करण्यासाठी आणि मदतीला बोलावण्यासाठी ही यंत्रणा वरदान ठरली आहे. आजतागायत ३६,७८२ पेक्षा जास्त वेळा या यंत्रणेचा वापर प्रशासनाने आणि नागरिकांनी केला असून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ११,२७,९२४ ग्रामस्थ या यंत्रणेत सहभागी आहेत.

या यंत्रणेच्या वापरामुळे जिल्ह्यात अनेक फायदे झाले आहेत. रांजणगाव, शिरूर आणि लोणावळा येथे चोरीला गेलेली वाहने शोधण्यात यश आले. वडगाव निंबाळकर, शिक्रापूर, मंचर, जुन्नर, इंदापूर आणि सासवड यांसारख्या अनेक ठिकाणी शेकडो एकर ऊस, गायरान आणि जंगल आगीपासून वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. दौंड, वालचंदनगर, बारामती आणि यवत येथे दरोडेखोर आणि चोरटे पकडण्यात पोलिसांना मोठी मदत झाली. तसेच पौड, खेड, शिरूर आणि राजगड परिसरात हरवलेली मुले आणि मुली शोधण्यातही या यंत्रणेचा मोठा वाटा राहिला आहे. वेळेवर मिळालेल्या सूचनेमुळे जनावरांचे प्राण वाचवणे आणि आगीसारख्या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ सूचना मिळाल्याने दुर्घटनांमध्ये तातडीने मदत मिळत होती आणि सरकारी योजनांची माहिती सहज पोहोचत होती. परंतु, जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निधीसाठी पाठपुरावा करूनही ग्रामसुरक्षा यंत्रणा अविरत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद ग्रामपंचायतींकडून न झाल्याने आणि प्रशासनाकडून योग्य तो प्रयत्न न झाल्याने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, या यंत्रणेच्या १८०० २७० ३६०० या टोल फ्री नंबरची सेवा ५ जुलै २०२६ पासून पुणे जिल्ह्यात पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही पूर्वसूचना देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे पाटील यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे