अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई; पण शहराबाहेरील ‘मृत्यूच्या सापळ्यांचे’ काय? २०० मीटरच्या परिघाबाहेर अवैध वाहतुकीचा सुळसुळाट; प्रशासनाचे डोळे एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच उघडणार का?

0
7
2
0
9
7
बारामती: राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी आणि बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, बारामती बसस्थानकाच्या २०० मीटर नो पार्किंग झोन मध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी स्थानिक पोलीस, एसटीची सुरक्षा व दक्षता शाखा आणि आगार प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून २० अवैध आणि नो-पार्किंगमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.

राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या निर्देशांनुसार आणि पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अशाच प्रकारची मोहीम नियमितपणे राबवून अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर मोहिमेत एसटीचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी विजय धनगर (पुणे), राखण व पहारा निरीक्षक इंगळे, सुरक्षा निरीक्षक लादे, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.प्रदीप काळे, दत्तात्रय भोसले, आकाश कांबळे, म. पो. हवा. सुनीता पाटील,आशा शिरतोडे तसेच बारामती आगाराचे व्यवस्थापक शिंदे,वाहतूक निरीक्षक पवार, सावंत आणि सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कदम यांनी सहभाग घेतला.




