Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली लूट; बिग बुल कंपनीकडून बारामतीत मोठी फसवणूक; गुंतवणूकदारांचे ६५ लाख बुडाले, फसवणूकग्रस्तांनी पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन

0 7 4 2 8 6

बारामती: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा १० ते १५ टक्के हमखास परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बारामतीत सुमारे ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनीही कागदपत्रे आणि पुराव्यांसह पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या गुन्ह्याच्या तपासात कार्तिक अरविंद नाळे आणि गौरव अरविंद नाळे या दोन आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यांनी बिग बुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्स तसेच बिग बुल ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल केली.

स्वतःला शेअर मार्केटमधील अनुभवी ट्रेडर आणि सेबी मान्यताप्राप्त व्यक्ती असल्याचे भासवून त्यांनी नागरिकांना शेअर मार्केट ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.

गुंतवणुकीवर दरमहा १० ते १५ टक्के निश्चित परतावा देण्याचे, मुद्दल पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचे आणि तोटा झाल्यास स्वतः जबाबदारी घेण्याचे आकर्षक आश्वासन आरोपींनी दिले होते. यावर विश्वास ठेवून फिर्यादी आणि साक्षीदारांनी तब्बल ६५ लाख रुपये रोख, यूपीआय, एनईएफटी आणि आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्याकडे जमा केले. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, एका गुंतवणूकदाराकडून घेतलेल्या ४९ लाख रुपयांच्या रकमेबाबत आरोपींनी नोटरीकृत करारनामा केला होता. मात्र, संबंधितांना कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम परत देण्यात आली नाही. रक्कम सुरक्षित राहावी म्हणून देण्यात आलेले काही धनादेशही बँकेत वटले नसून ते बाऊन्स झाले आहेत.

या प्रकरणात अद्याप अनेक फसवणूकग्रस्त पुढे आलेले नसल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे बिग बुल ट्रेडिंग कंपनी किंवा या आरोपींशी संबंधित कोणत्याही शेअर मार्केट योजनेत पैसे गुंतवलेल्या नागरिकांनी तत्काळ बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. नागरिकांनी येताना आपली ओळखपत्रे (आधार कार्ड, पॅन कार्ड), बँक खाते स्टेटमेंट, व्यवहारांच्या पावत्या, बाऊन्स झालेले धनादेश, करारनामा, व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम मेसेज, आणि इतर सर्व संबंधित इलेक्ट्रॉनिक तसेच छापील पुरावे सोबत आणावेत. माहिती देणाऱ्यांची गोपनीयता राखली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी आणि पोलीस उपनिरीक्षक रक्तदीप भंडारे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. फसवणूकग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे