Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

गावचा सरपंच! तब्बल १३ गंभीर गुन्हे चार महिने पोलिसांना गुंगारा अखेर फरार सरपंचाच्या मुसक्या आवळण्यात माळेगांव पोलिसांना यश

राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन खुनाचा कट; चार महिने पोलिसांना गुंगारा देणारा सरपंच अखेर गजाआड

0 9 9 2 2 0

बारामती : राजकीय वैमनस्यातून एका तरुणाचा काटा काढण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करून खुनाची सुपारी देणाऱ्या एका विद्यमान सरपंचाला माळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ‘अभि यादव वाचता कामा नये’ अशी थेट धमकी देत, ५ लाख रुपये आणि दोन गावठी पिस्तूल देऊन हा थरारक कट रचण्यात आला होता. तब्बल चार महिने पोलिसांना गुंगारा देणारा मेदड गावचा सरपंच गणेश दत्तात्रय काशीद हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी माळेगाव पोलिसांनी मयुर विष्णू मोरे आणि गणेश तात्याराम गावडे या दोघांना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि एक कुकरी सापडली होती. या गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक अत्यंत धक्कादायक माहिती लागली. मेदडचे सरपंच गणेश काशीद आणि सुजित निलेश नाळे यांनी अल्पवयीन मुलांमार्फत अभिजीत अर्जुन यादव या तरुणाला जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले.

या खुनाच्या कटासाठी सरपंच गणेश काशीद याने स्वतःची जमीन विकून मयुर मोरे याला ८ लाख रुपयांचा चेक दिला होता. ही रक्कम बारामती येथील बँकेतून रोख स्वरूपात काढण्यात आली. त्यानंतर खंडोबानगर येथे एका फॉर्च्युनर गाडीत बसलेल्या सुजित नाळे याला ५ लाख रुपये आणि दोन गावठी पिस्तूल देण्यात आले. यावेळी ‘अभि यादव वाचता कामा नये’ आणि हे काम करणारी मुले अल्पवयीन आहेत याची खात्री करून घे, अशा स्पष्ट सूचना सरपंच काशीद याने दिल्या होत्या. या सर्व भयानक प्रकारामागे गणेश काशीद आणि अर्जुन यादव यांच्यातील राजकीय वैर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्यात आपला सक्रिय सहभाग उघडकीस आल्याचे समजताच सरपंच गणेश काशीद याने गावातून पलायन केले होते. तो वारंवार आपली ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत पळत होता. मात्र, माळेगाव पोलिसांनी शिताफीने तपास करत २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता या फरार सरपंचाच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.

अटक करण्यात आलेला सरपंच गणेश काशीद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, खंडणी यांसारखे तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे आणि त्यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे