Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बोगस आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून नोकरीच्या आमिषाने ७ लाख ८५ हजारांची फसवणूक; बारामतीत तोतयाला अटक

1 0 3 4 0 5

बारामती : आपण आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तरुणाची तब्बल ७ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. तोसीन इब्राहिम मनियार (रा. सय्यद पाटकर वस्ती, बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे डोर्लेवाडी येथील तरुण आरीफ शहाजहान शेख आणि त्यांच्या भावाला आरोपी तोसीन मनियार याने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. आपल्या ओळखीने अन्न व प्रशासन विभागात सरकारी नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने आरीफ शेख यांच्याकडून सुमारे ७ लाख ८५ हजार रुपये उकळले. एवढेच नव्हे तर विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने नोकरीचे खोटे आणि बनावट प्रमाणपत्र तसेच नियुक्ती पत्र तयार करून देत सन २०२२ ते २०२६ या कालावधीत त्यांची आर्थिक फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरीफ शहाजहान शेख यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२), ३४०(२), ३ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत योग्य नियोजन करून गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी या बोगस आयपीएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये बारामती शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनिषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री देवकाते, पोलीस शिपाई विजय ओमासे आणि पोलीस शिपाई प्रविण शिंगाडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे