गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
शिरूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २२ लाखांचा एम.डी. अमली पदार्थ जप्त, राजस्थानच्या दोघांना अटक

0
8
4
4
0
2
पुणे / शिरूर: ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. पुणे ग्रामीण हद्दीत बेकायदेशीर अमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी विशेष पथके तयार केली होती.
१८ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. मलठण गावच्या हद्दीतील राजावाडा चौकात दोन इसम प्रतिबंधित एम.डी. अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे शिरूर उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश घेऊन पंच आणि आवश्यक साहित्यासह स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री १२:१० च्या सुमारास सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१) सुरेंद्रसिंह भैरूसिंह राठोड उर्फ राजपूत (वय २४ वर्षे, सध्या रा. मनिष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राज्य राजस्थान ३४४०२६)
२) श्रवण तेजाराम बिश्नोई (वय ३१ वर्षे, सध्या रा. मनिष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राज्य राजस्थान)
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ११० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एम.डी. अमली पदार्थ आणि एक मोटारसायकल, असा एकूण २२,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.




