Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

सोमेश्वर’ची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती; “दादांना खंबीर साथ देणं हीच खरी श्रद्धांजली”; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत कपबशी पॅनेलला मतदान करण्याचे सुनेत्रा पवारांचे आवाहन

0 9 4 3 0 6

बारामती: श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या (२०२६-२०३१) रणधुमाळीला आता वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या प्रचारासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई पवार या स्वतः मैदानात उतरल्या आहेत. मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या नियोजित संवाद बैठकीच्या दौऱ्याची सुरुवात मुरूम येथील श्री भैरवनाथ मंदिर येथून झाली. यावेळी मुरूममधील सभासद आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आगामी काळातील आव्हाने आणि अजितदादांचे कारखान्यावरील प्रेम यावर भाष्य करत ‘कपबशी’ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.

सभेला संबोधित करताना सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लागल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आज राज्यात उसाला अत्यंत चांगला भाव मिळालेला आहे. शेतकरी समाधानी असताना खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. अशी निवडणूक होईल आणि प्रचारासाठी यावं लागेल, याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता.” अजितदादांचे सोमेश्वर कारखान्यावर स्वतःच्या कुटुंबापेक्षाही जास्त प्रेम असून, त्यांनी या कारखान्यासाठी नेहमीच आपला वेळ आणि खंबीर पाठिंबा दिला असल्याची आठवण त्यांनी सभासदांना करून दिली.

दुष्काळाचे सावट आणि पुढील आव्हाने
यंदा राज्यात विशेषतः मराठवाड्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उसावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याच्या सूचना असल्या तरी, यंदा गाळप कमी प्रमाणात होईल आणि कालावधीही कमी मिळेल. आगामी काळ शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यांसाठी तडजोडीचा आणि आव्हानात्मक असणार आहे.” अशा कठीण परिस्थितीत कारखान्याची धुरा योग्य आणि खंबीर नेतृत्वाच्या हाती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी अत्यंत मार्मिक उपमा दिली. “ज्याप्रमाणे कपाला बशीचा आधार लागतो, त्याचप्रमाणे दादांना तुमची साथ हवी आहे,” असे सांगत त्यांनी ‘कपबशी’ या निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन केले. अजितदादांनी आजवर शेतकऱ्यांना सर्वोच्च भाव देण्यासाठी स्वतःला पणाला लावले असून, दादांच्या या धोरणांना साथ देण्यासाठी मतदारांनी पॅनेलच्या पाठीशी उभे राहावे, अशी भावनिक साद त्यांनी घातली.

निवडणुकीत तीन पॅनेल असल्याने अनेक ठिकाणी नातेवाईकच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे ‘क्रॉस व्होटिंग’ची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मतदारांनी कोणत्याही दबावाला किंवा भावनेला बळी न पडता पॅनेललाच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, वयस्कर महिला मतदारांकडून शिक्का मारताना चूक होऊ नये आणि एकही मत वाया जाऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

११ ऑक्टोबर रोजी मतदान
मुरूम येथील सकाळच्या सत्रातील बैठकीनंतर त्यांच्या वाणेवाडी, कोऱ्हाळे खुर्द (बाजारतळ), कोऱ्हाळे बुद्रुक (श्री सिद्धेश्वर ग्रामसचिवालय) आणि वडगाव निंबाळकर (ग्रामपंचायत कार्यालय) येथेही संवाद बैठका पार पडत आहेत. रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत कारखान्यासाठी मतदान पार पडणार असून, ‘श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या सर्व उमेदवारांना ‘कपबशी’ या चिन्हावर शिक्का मारून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन या दौऱ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे