Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह अल्पवयीन बालक ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 9 1 8 9 6

बारामती: बारामती शहरातील तांबेनगर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाला स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) आणि बारामती तालुका पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार २३ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. सायंकाळी सुमारे १६.२० वाजता तांबेनगर येथील सचिन इलेक्ट्रिक दुकानाजवळ एक जण दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचांसमक्ष सापळा लावून या विधी संघर्षित बालकाला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
या बालकाची कायदेशीररीत्या अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत पितळी काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी त्याला बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३(१), २५ अन्वये गु.र.नं. ४५९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे शस्त्र त्याने कोठून आणले, याचा स्रोत काय आहे आणि त्यामागे अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक राम हरी भोसले करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बाळासाहेब कारंडे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार किशोर तेलंग, स्वप्नील अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, सुलतान डांगे, पोपट नाळे, सचिन होळकर, पोलीस अंमलदार गणेश डेरे, रहिस मुलाणी आणि तुषार चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

बारामती विभागात बेकायदा गावठी पिस्तूल, काडतुसे किंवा इतर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या व त्यांची खरेदी-विक्री अथवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांकडून कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे