गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई सराईत बुलेट चोर गजाआड; ३० लाखांच्या १९ दुचाकी जप्त, तब्बल १९ गुन्हे उघडकीस

0
8
3
5
6
6
बारामती : गेल्या पंधरा दिवसांपासून बारामती शहर आणि तालुक्यात बुलेट चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक आणि पोलीस दोघेही हैराण झाले होते. मात्र, या दुचाकी चोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईचा थरार एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखाच होता. या सराईत चोराने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी थेट चोरीच्या गाड्यांवर महाराष्ट्र पोलीस आणि वनसेवा असे शासकीय लोगो लावून फिरण्याची शक्कल लढवली होती.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बुलेट चोरीच्या घटना वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी विशेष पथके तयार केली होती. रात्रगस्त आणि पेट्रोलिंग सुरू असतानाच पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, एक संशयित तरुण चोरीची बुलेट घेऊन मेडिकल कॉलेज परिसरात येणार आहे.
ही माहिती मिळताच तपास पथकाने क्षणाचाही विलंब न करता मेडिकल कॉलेज परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. पोलिसांची नजर प्रत्येक जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनावर होती. तेवढ्यात पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेजच्या दिशेने एक संशयित तरुण बुलेटवर येताना पोलिसांना दिसला. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत या तरुणाने आपले नाव समाधान बाळू काळे, वय २३ वर्षे, राहणार मानेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा असे सांगितले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने जे सत्य उघड केले, ते ऐकून पोलीसही चक्रावले.

त्याची चोरीची पद्धत अत्यंत धक्कादायक आणि धाडसी होती. तो प्रामुख्याने रात्रीच्या वेळी फक्त व्ही.आय.पी. नंबर प्लेट असलेल्या बुलेट आणि इतर दुचाकी टार्गेट करत असे. गाडी चोरी केल्यानंतर पोलिसांच्या नाकाबंदीत किंवा चेकिंगमध्ये पकडले जाऊ नये म्हणून तो अत्यंत शिताफीने चोरीच्या गाड्यांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा आणि एसटी महामंडळ असे बनावट शासकीय लोगो लावत असे. या बनावट ओळखीचा वापर करून तो पोलिसांच्या नजरेतून वाचण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिसांनी समाधान काळे याच्याकडून तब्बल १३ बुलेट आणि इतर ६ मोटारसायकली असा एकूण १९ दुचाकींचा मोठा ताफा जप्त केला आहे. या सर्व गाड्यांची बाजारातील किंमत सुमारे ३० लाख रुपये इतकी आहे. या एका धडक कारवाईमुळे बारामती शहर आणि बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल १९ गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले आहेत.





