ब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती विभागात पोलिस दलाची प्रतिमा मलिन, कारवाई न करण्यासाठी पोलिसाला ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

0
8
8
4
5
4
बारामती/पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बारामतीमध्ये एक धडक कारवाई करत एका पोलीस हवालदाराला तब्बल ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. महेश अंकुश उगले (वय ३६, नेमणूक – बारामती तालुका पोलीस स्टेशन) असे या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे संपूर्ण बारामती पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ३५) यांच्या पत्नीचा बारामती परिसरात झुम्बा डान्स क्लास आणि जिम आहे. या क्लासमुळे त्रास होत असल्याच्या काही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. या अर्जाचा तपास हवालदार महेश उगले यांच्याकडे होता. या प्रकरणात तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाचखोर उगले याने तब्बल ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या मोठ्या रकमेपैकी २ लाख रुपये त्याने आधीच स्वीकारले होते. मात्र, उर्वरित ५ लाख रुपयांसाठी तो सतत तगादा लावत होता आणि कारवाईची भीती दाखवत होता. अखेर त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ७ सप्टेंबर २०२६ रोजी थेट पुणे एसीबीकडे धाव घेतली. एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी केली असता, हवालदार उगले याने तडजोडीअंती उर्वरित ५ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी बारामती येथील माळेगाव रोडवरील एचडीएफसी बँकेच्या जवळ एसीबीने सापळा रचला. दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी तक्रारदाराकडून ५ लाख रुपयांची रोकड स्वीकारताना लाचखोर हवालदार महेश उगले याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
ही धडक कारवाई पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप अधीक्षक सतीश वाळके आणि त्यांच्या पथकाने (पोलीस हवालदार प्रवीण तावरे, आश्विन कुमकर, चंद्रकांत कदम) केली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे आणि कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.



