Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई; सराईत गुंड मोन्या देडगे याला ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्ध करत अकोला कारागृहात रवानगी

​शिक्रापूर, रांजणगाव औद्योगिक वसाहतीत दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांचा मोठा दणका. ​सराईत गुन्हेगार सुरज उर्फ मोन्या देडगे याच्यावर ६ गंभीर गुन्हे दाखल. ​'धोकादायक व्यक्ती' म्हणून घोषित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एका वर्षासाठी स्थानबद्ध.

0 8 5 5 0 6

 

शिक्रापूर, : औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या शिक्रापूर आणि परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. परिसरात दहशत निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार सुरज उर्फ मोन्या संजय देडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर) याच्यावर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याला अकोला मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्यामुळे आर्थिक व्यवहार आणि नागरिकांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. याचा गैरफायदा घेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी दिले होते.

​या आदेशानुसार शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हद्दीतील गुन्हेगारांचे अभिलेख तपासले. यामध्ये सुरज उर्फ मोन्या देडगे याच्याविरुद्ध चंदननगर, शिरूर, नारायणगाव आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, शिवीगाळ आणि दमदाटी असे एकूण ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.

वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या देडगे याच्यावर ठोस कारवाई करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत एक विशेष प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांमार्फत पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, अंमलदार महेश बनकर आणि शिक्रापूरचे रोहिदास पारखे यांनी या प्रस्तावाचा सखोल पाठपुरावा केला.

​याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी देडगे याला ‘धोकादायक व्यक्ती’ या प्रवर्गात घोषित करत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेश प्राप्त होताच पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत त्याला शोधून ताब्यात घेतले व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची रवानगी अकोला कारागृहात केली.

ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (पुणे विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले (शिरुर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जितेंद्र पानसरे, महेश बनकर, रोहिदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे आणि नारायण वाळके यांच्या पथकाने सहभाग घेतला.

“औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही!”

​’शिक्रापूर व रांजणगाव परिसरातील एमआयडीसी क्षेत्रात दहशत, दादागिरी किंवा गुंडगिरी करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. उद्योजक, कामगार, व्यावसायिक किंवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन दबाव निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. याबाबत माहिती मिळताच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रात शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत.’

​संदिपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे