बारामती : बारामती शहरात इन्स्टाग्रामवरून दोन लाख रुपयांची (दोन पेटी) खंडणी मागून ती देण्यास नकार दिल्याने बांधकाम व्यावसायिकाच्या आलिशान डिफेंडर गाडीवर गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत पर्दाफाश केला आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ही धडाकेबाज संयुक्त कामगिरी करत मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळे याला अटक केली असून, त्याच्या दोन विधी संघर्षग्रस्त साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास बारामतीतील नक्षत्र गार्डनच्या पाठीमागे असलेल्या शिवशंभो नगर (सूर्यनगरी) येथील ‘अनन्या व्हिला’ येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक राजन धनंजय कोळेकर (वय ३५ वर्षे) यांना ‘बी. के. ग्रुप’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून कॉल आला होता. समोरील व्यक्तीने “मी बी.के. बोलतोय, तुम्ही सगळ्यांना पैसे देता, मला दोन पेटी (दोन लाख रुपये) द्या,” अशी खंडणीची मागणी केली. मात्र, कोळेकर यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार देताच समोरील व्यक्तीने फोन कट केला.
हा धमकीचा फोन येऊन अवघे दोन तास उलटत नाहीत तोच, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका मोटारसायकलवरून आलेल्या बंड्या उर्फ अक्षय काळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी कोळेकर यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या डिफेंडर (MH42BY7474) या आलिशान चारचाकी गाडीवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने गोळीबार झाला त्यावेळी गाडीमध्ये किंवा पार्किंग परिसरात कोळेकर यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
भरवस्तीत घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण बारामती शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी राजन कोळेकर यांच्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८(३), ३०८(४), ३(५) तसेच भारतीय शस्त्र अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी तात्काळ पाच तपास पथके रवाना केली.
तपास सुरू असतानाच पोलिसांच्या पथकाने दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, हा गोळीबार त्यांचा साथीदार बंड्या उर्फ अक्षय काळे याच्यासोबत मिळून केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तूल पुरावा म्हणून जप्त केली आहेत. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळे याचा शोध घेऊन त्यालाही अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत.
ही धडाकेबाज कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या तपास पथकांनी केली. अवघ्या आठ तासांत गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्याने बारामतीकरांनी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे स्वागत केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा