गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
एमआयडीसीतील कंपन्यांना बेकायदेशीरपणे त्रास दिल्यास गुन्हे दाखल होणार, शिक्रापूर पोलिसांचा इशारा

0
8
5
0
1
5
शिक्रापूर, दि. ४: शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवारी (दि. ३) शिक्रापूर एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे एचआर मॅनेजर व प्रतिनिधी यांची एक समन्वय बैठक घेण्यात आली. उद्योगांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. दादागिरी करून पैसे मागितल्यास थेट खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा शिक्रापूर पोलिसांनी दिला आहे.

या बैठकीत कंपन्यांना येणाऱ्या विविध अडचणी आणि सुरक्षा व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक वसाहतीमध्ये लेबर, स्क्रॅप, ट्रान्सपोर्ट, केटरिंग, सिक्युरिटी, हाऊसकिपिंग किंवा पाण्याचे टँकर यांसारख्या कामांचे ठेके मिळवण्यासाठी जर कोणी व्यक्ती किंवा संघटना बेकायदेशीर दबाव टाकत असेल, पैशांची मागणी करत असेल किंवा धमक्या देत असेल, तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले. अशा तक्रारी आल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच एमआयडीसी परिसरातील चोऱ्या थांबवणे, कंपनी परिसरात पोलिसांची गस्त वाढवणे, वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे, आणि कामगारांची लुटमार रोखणे यावरही चर्चा झाली. परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती आणि नोंदी कंपन्यांनी अद्ययावत ठेवाव्यात असे सांगण्यात आले.
उद्योग आणि व्यवसाय सुरळीतपणे चालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांकडून २४ तास आवश्यक ते सहकार्य व संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही देण्यात आली. कोणताही संशयास्पद किंवा बेकायदेशीर प्रकार दिसल्यास लगेच पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित कंपनी प्रतिनिधींनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत करत आभार मानले.
यावेळी क्रोम वेल इंजीनियरिंगचे नीलेश गव्हाणे, संदीप दिवेकर, जॉन डीअरचे राम अहिरे, अलिकॉनच्या श्रीमती जाधव, हर्ष ओगलचे मारुती पाटील, मॅक अल्टीचे असलम परवेज व इतर प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या.




