गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
कोयत्याचा धाक दाखवून प्रेमी युगलाला लुटणारा १० महिन्यांनंतर गजाआड; बारामती पोलिसांची धडक कारवाई!
तांदुळवाडी एलसी लेक परिसरात १६ जून २०२५ रोजी घडली होती घटना. तब्बल १० महिन्यांच्या तपासानंतर बारामती तालुका पोलिसांकडून आरोपीला बेड्या. आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जप्त.

0
6
3
2
9
3
बारामती : तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात प्रेमी युगलावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून लूटमार करणाऱ्या आरोपीला तब्बल १० महिन्यांनंतर बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
दिनांक १६ जून २०२५ रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. फिर्यादी तरुण (वय २२, रा. मार्केटयार्ड, बारामती) हा आपल्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत बसला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
एका आरोपीने तरुणाला धमकावत मोबाईल आणि पैशांची मागणी केली. तरुणाने याला प्रतिकार केला असता, आरोपीने लोखंडी कोयत्याने त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर व मांडीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर आरोपींनी जबरदस्तीने तरुणाकडील २,५०० रुपये रोख आणि पोको (Poco) कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. एवढेच नव्हे तर, सोबत असलेल्या मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळीही ओरबाडून घेतली. जाताना आरोपींनी तरुणाच्या मोटारसायकलची चावीही सोबत नेली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.






