Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र

खाकीचा अतिरेक, होमगार्ड की पोलीस?  ओळखणे कठीण!  बारामती तालुक्यात होमगार्ड्सच्या वागणुकीवरून संताप; हे ‘जनसेवक’ की ‘शासक’?

0 5 4 4 2 6

बारामती :  नुकत्याच बारामतीमध्ये एका होमगार्ड जवानावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने यावर ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेत गुन्हे दाखल केले असले, तरी या घटनेच्या मुळाशी असलेले एक गंभीर वास्तव आता चव्हाट्यावर आले आहे. पोलीस दलाचे ‘पूरक बल’ म्हणून ओळखले जाणारे होमगार्ड सध्या स्वतःला ‘पोलीस’ भासवून नागरिकांवर अरेरावी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे “आम्ही तुमचे सेवक आहोत की तुम्ही आमचे?” असा संतप्त सवाल सामान्य जनता विचारत आहे.

राज्याच्या आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे होमगार्ड हे मुळात ‘स्वयंसेवी’ तत्त्वावर काम करणारे जवान आहेत. नियमानुसार, त्यांच्या गणवेशावर ‘होमगार्ड’ असा स्पष्ट उल्लेख असणे अनिवार्य आहे. मात्र, बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी हे जवान गणवेशावर ‘महाराष्ट्र पोलीस’ असे लिहिलेले  जॅकेट घालून कर्तव्यावर दिसतात.

सामान्य नागरिक या जॅकेटमुळे त्यांना ‘पोलीस कर्मचारी’ समजतात. याच भ्रमाचा फायदा घेत अनेक होमगार्ड वाहनचालकांना अडवणे, लायसन्स मागणे आणि दंडाची भीती दाखवून दमदाटी करणे असे प्रकार करत आहेत. जे अधिकार कायद्याने त्यांना दिलेलेच नाहीत, त्यांचा वापर केवळ ‘खाकी’च्या जोरावर केला जात असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून स्पष्ट दिसत आहे.

गर्दी असताना किंवा वाहतूक नियंत्रण व नियमन करत असताना व पोलीसांना मदतीसाठी होमगार्ड हे अधिकृत गणवेशात व नेमप्लेटसह शासकीय कर्तव्य बजावत असतात हे नियमानुसार योग्यच आहे,

पण रस्त्यावरील अनेक दृश्यांमध्ये असे दिसते की, मुख्य पोलीस कर्मचारी सावलीत किंवा गाडीत बसलेले असतात आणि भर उन्हात बॅरिकेड्सवर होमगार्डला पुढे केले जाते. पोलिसांच्या इशाऱ्यावर “त्याला अडव, त्याला बाजूला घे” असे आदेश पाळताना होमगार्ड्सना आपणच सर्वाधिकार संपन्न अधिकारी असल्याचा भास होऊ लागतो. वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त असेल तिथे

पोलिसांच्या या ‘वरदहस्ता’मुळेच होमगार्डची भाषा ‘सौजन्यपूर्ण’ न राहता ‘मुजोर’ होत चालली आहे असे निदर्शनास येत आहे.

होमगार्ड हे लोकसेवक श्रेणीत येतात, त्यामुळे त्यांच्या कामात अडथळा आणणे हा गुन्हा आहे. परंतु, जेव्हा हेच लोकसेवक आपल्या मर्यादा ओलांडून नागरिकांशी अर्वाच्य भाषेत बोलतात किंवा पोलीस असल्याचे भासवून दमबाजी करून जनतेची दिशाभूल करतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई कोण करणार?

“आम्ही कर भरतो, आम्हाला सन्मानाने वागवा” अशी रास्त अपेक्षा व्यक्त करणाऱ्या नागरिकाला थेट ‘शासकीय कामात अडथळा’ या कलमाची भीती दाखवली जाते. ही एक प्रकारे लोकशाहीतील नागरिकांची ‘आडवणूक’ आणि प्रशासकीय ‘दडपशाही’ आहे.

 होमगार्डना ‘महाराष्ट्र पोलीस’चे जॅकेट वापरून नागरिकांची दिशाभूल करण्याची मुभा कोणी दिली?

स्वयंसेवी दलाच्या जवानांना त्यांच्या मर्यादा आणि कर्तव्याचे प्रशिक्षण दिले जाते का?

केवळ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा,अशा गोष्टी करणार्ऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार?

असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित आहेत.

वर्दीवर हात उगारणे हे कायद्याला आव्हान देणारे नक्कीच आहे आणि चुकीचेच आहे, यात दुमत नाही. मात्र, जर ‘रक्षकच भक्षक’ होऊन किंवा अधिकाराचा गैरवापर करून सामान्य माणसाला अडचणीत आणत असतील, तर हा संघर्ष अटळ आहे. आज गरज आहे ती होमगार्ड्सना ‘स्वयंसेवक’ आणि ‘जनसेवक’ असल्याची जाणीव करून देण्याची. अन्यथा, सेवेच्या नावाखाली सुरू असलेली ही ‘पोलीसगिरी’ भविष्यात पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेलाच तडा देणारी ठरेल हे मात्र नक्की.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे