Breaking
अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिकसोशल मिडिया

बारामती पोलिसांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले. ‘तारणहार’ बनून आला आणि भयानक कट रचला! पोलिसांच्या संवेदनशील तपासातून तरुणीची सुटका,

बारामती शहर पोलिसांनी संवेदनशील पणे तपास करत एका ब्लॅकमेलिंग आणि एआयच्या (ChatGPT) माध्यमातून रचलेल्या भयानक कटातून तरुणीची सुटका केली आहे, एखाद्या क्राईम थ्रिलरलाही लाजवेल असा तपास...

0 8 9 8 0 2

बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये १० सप्टेंबर २०२६ रोजी एका चिंताग्रस्त पित्याने धाव घेतली. त्यांची तरुण मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. मैत्रिणीकडे जाते असे सांगून घरातून पडलेली मुलगी परतलीच नव्हती. पोलीस दप्तरी ‘मिसिंग’ची नोंद झाली, पण हे प्रकरण केवळ एका हरवलेल्या मुलीपुरते मर्यादित नव्हते. यामागे एक भयानक कट शिजत होता, ज्याचा पर्दाफाश बारामती पोलिसांच्या सतर्कतेमुळे होणार होता.

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी तात्काळ विशेष मिसिंग पथकाला कामाला लावले. महिला पोलीस हवालदार मोनिका मोहिते आणि ज्योती डीसले यांनी तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने अवघ्या काही तासांत तरुणीचा शोध घेतला. मुलगी सुरक्षित सापडली, पण पोलिसांचे काम इथे संपले नव्हते, तर खऱ्या तपासाला इथूनच सुरुवात झाली होती.

मुलीच्या चेहऱ्यावरील भीती आणि गोंधळ पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन अत्यंत संवेदनशीलपणे तिच्याशी संवाद साधला. तेव्हा एका भयानक गुन्ह्याची साखळी उलगडत गेली. कुटुंबाच्या ओळखीतीलच एका नराधमाने तिला आधी जाळ्यात ओढले, गुपचूप एक स्वतंत्र मोबाईल दिला आणि नंतर तिचे वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

या संकटातून तिला वाचवण्याचे नाटक करत दुसरा एक तरुण ‘तारणहार’ बनून तिच्या आयुष्यात आला. आपण एका सामाजिक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून त्याने तिचा विश्वास जिंकला, प्रेमाचे नाटक केले आणि लग्नाचे आमिष दाखवले. पण त्याचा खरा हेतू अत्यंत भयंकर होता.

बारामती शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली. 

या भामट्याने चक्क आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे ‘ChatGPT’ चा वापर करून, तरुणीच्या आई-वडिलांपासून तिला जिवाचा धोका असल्याचा एक बनावट आणि गंभीर अर्ज तयार केला होता. तो हा अर्ज पोलिसांत देऊन तरुणीला कायमचे तिच्या कुटुंबापासून तोडण्याच्या आणि तिला कुटुंबापासून वेगळे करून एका स्वतंत्र खोलीत ठेवण्याच्या तयारीत होता. एका निष्पाप तरुणीला तिच्याच कुटुंबाच्या विरोधात उभे करण्याचे हे एक भयंकर षडयंत्र होते.

ही योजना उघडकीस येताच पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि हुशारीने पावले उचलली. घाईघाईने कोणताही निर्णय न लादता, पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि वकिलांना पाचारण केले. त्या भोंदू सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा फाडण्यात आला आणि त्याच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले. दुसरीकडे, तरुणीला अत्यंत मायेने आणि संवेदनशीलतेने समजावून सांगण्यात आले की ती कशा प्रकारच्या भयानक जाळ्यात अडकत चालली होती. तिला तिचे सुरक्षित पर्याय समजावून सांगण्यात आले आणि अंतिम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिलाच देण्यात आले.

सत्याची जाणीव झाल्यानंतर त्या तरुणीने स्वतःच्या इच्छेने आई-वडिलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ती अनेक तास भीतीच्या छायेत असलेल्या आणि जिवाचा आकांत करत असलेल्या आपल्या आई-वडिलांना भेटली, तेव्हा तिने आईला घट्ट मिठी मारली. पोलीस स्टेशनमधील वातावरण गहिवरून गेले होते.

एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशा या गुन्ह्यात, बारामती शहर पोलिसांनी दाखवलेली तत्परता, कर्तव्यदक्षता आणि केलेले उत्कृष्ट समुपदेशन यामुळे एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. केवळ बेपत्ता व्यक्तीला शोधणे नव्हे, तर ती सुरक्षित आहे की नाही आणि तिच्यावर कोणताही मानसिक दबाव नाही ना, याची सखोल पडताळणी करून बारामती पोलिसांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे