बारामती: लग्नाचे आमिष दाखवून एका ३६ वर्षीय तरुणीवर तब्बल १४ वर्षे अत्याचार केल्याचा आणि तिची ८ ते १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार बारामती तालुक्यात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य मंगेश प्रताप जगताप (वय ४२, रा. पणदरे, ता. बारामती) यांच्यावर माळेगाव पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या फसवणुकीला कंटाळून आणि हताश झालेल्या पीडितेने पुण्यात चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आणि दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी झेडपी सदस्य मंगेश जगताप यांची २००७ मध्ये महाविद्यालयात असताना ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. त्यावेळी आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, २०१२ मध्ये त्याने तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता दुसऱ्याच तरुणीशी लग्न केले. हा प्रकार समजल्यानंतर संतप्त पीडितेने त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले. परंतु, वासनांध आरोपीने तिला सोडले नाही. त्याने स्वतःच्या आईला कॅन्सर झाल्याचे भावनिक कारण पुढे करत माणुसकीच्या नात्याने तिच्याशी पुन्हा संवाद सुरू केला.
घरी दबावाखाली लग्न झाले असून मी लवकरच पत्नीला घटस्फोट देणार आहे, अशी बतावणी त्याने केली. पीडितेचा विश्वास बसावा म्हणून त्याने चक्क घटस्फोटाची काही बनावट कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रही तिला दाखवले. या कटात आरोपीची पत्नी मयुरी, भाऊ चेतन ऊर्फ बाबा, अमर जगताप, रणजित तावरे आणि ज्योती भगत यांनीही पीडितेला खोटे सांगून मंगेशचा घटस्फोट होणार असल्याचे भासवले. या सर्व भूलथापांना बळी पडून पीडितेने पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवला.
घटस्फोट झाल्यानंतर लग्न करू, या आमिषाखाली आरोपी मंगेश जगताप याने २०१२ ते २०२६ या प्रदीर्घ काळात पणदरे येथील स्वतःच्या फार्म हाऊसवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. एवढेच नाही, तर त्याने तिच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तब्बल ८ ते १० लाख रुपये उकळून तिची मोठी आर्थिक फसवणूकही केली.
दिनांक २७ जुलै २०२६ रोजी नवीन जिल्हा परिषद इमारतीत सर्वसाधारण बैठक असल्याने आरोपी तिथे येणार असल्याची माहिती पीडितेला मिळाली होती. गेले अनेक दिवस तो तिला टाळत असल्याने ती त्याला भेटण्यासाठी थेट तिथे पोहोचली. मात्र, तिला पाहताच त्याने तेथून पळ काढला. आपली केवळ फसवणूक झाली असून हा व्यक्ती आपल्याशी लग्न करणार नाही, याची पूर्ण खात्री पटल्याने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या या तरुणीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला संपवण्याचा अघोरी प्रयत्न केला.
या धक्कादायक घटनेनंतर सुरुवातीला पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा माळेगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. माळेगाव पोलिसांनी मंगेश जगताप याच्यावर बीएनएस ३१८(२), ६९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा आरोपी फरार असून, माळेगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. एका लोकप्रतिनिधीनेच अशा प्रकारचा नीच कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा