Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती वनविभागाचा लाचखोर वनपाल एसीबीच्या जाळ्यात; ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक !

0 9 9 5 5 8

बारामती : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) दुपारी बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरातील हॉटेल शिवकृपा समोर एका वनपालाला ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जहीर सिराज शेख (वय ४७, वनपाल, करंजे राऊंड ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बारामती) असे या कारवाईत अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ६० वर्षीय शेतकऱ्याने १४ ऑक्टोबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याची कोऱ्हाळे खुर्द येथे ४ हेक्टर शेतजमीन असून, पावसामुळे त्यांच्या शेतातील माती नीरा नदीत वाहून गेली होती. ही माती नदीपात्रातून काढून पुन्हा शेतात टाकत असताना, २६ सप्टेंबर रोजी वनपाल जहीर शेख यांनी ‘ही जागा वनविभागाच्या मालकीची आहे’ असे सांगून कारवाईची भीती घालत ते काम बंद पाडले होते. त्यानंतर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आणि माती भरावाचे काम सुरू ठेवू देण्यासाठी शेख याने त्यांच्या सहकारी ‘भुमरे मॅडम’ व स्वतःसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि त्यापैकी ४ हजार रुपये त्याच दिवशी स्वीकारले होते. मात्र, उर्वरित ६ हजार रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नका, अशी मागणी त्याने पुन्हा केल्याने शेतकऱ्याने एसीबीकडे धाव घेतली.

या तक्रारीची २३ ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आल्यानंतर, २५ ऑक्टोबर रोजी माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा समोर सापळा रचून तक्रारदाराकडून उर्वरित ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जहीर शेख याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पुणे ग्रामीणच्या माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही धडक कारवाई ला.प्र.वि. पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सतीश धाडके, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली. तसेच, लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही एसीबीतर्फे या प्रेस नोटद्वारे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे