बारामती : शहरात एका उच्चशिक्षित तरुणीच्या गूढ मृत्यूने खळबळ उडवून दिली आहे. बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यात एमपीएससीची तयारी करणारी एक होतकरू तरुणी अचानक मृत्यूच्या दारात कशी पोहोचली, हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.
नुकतीच तिची लग्नाची बोलणी झाली होती, संसाराची स्वप्ने रंगवली जात होती. पण, एका रात्रीत सर्व काही संपले. या मृत्यूमागे एक ‘रहस्यमय गोळी’ आणि अनेक अनुत्तरित प्रश्न दडलेले आहेत.
ऑक्टोबर २०२५ मध्ये पुण्यात एमपीएससीची तयारी करत असताना, या तरुणीची ओळख बारामतीच्या इंदापूर रोडवरील गजानन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मुलीच्या कुटुंबीयांना हे समजल्यावर त्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये तिला बारामतीला परत आणले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी बसून त्यांच्या लग्नाला होकारही दिला होता. १२ एप्रिल २०२६ रोजी अथर्वचे कुटुंबीय मुलीच्या घरी गेले आणि सोयरीक पक्की झाली. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे वाटत असतानाच, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
घटनेच्या १५ ते २० दिवस आधीपासूनच ती तरुणी अस्वस्थ आणि शांत होती. आईने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता, एक धक्कादायक माहिती समोर आली.
अथर्व तिच्याकडे वारंवार शारीरिक संबंधांसाठी तगादा लावत होता आणि तिला काही गोळ्या खाण्यास देत होता, असे मैत्रिणीने सांगितले. ही माहिती आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकवून गेली.
तो काळरात्र ठरलेला दिवस होता ६ ऑगस्ट २०२६. दुपारी साडेबाराच्या सुमारास अथर्व तिला एमबीए प्रवेशासाठी बारामतीतील एका महाविद्यालयात घेऊन गेला. संध्याकाळी चार वाजता तिने आईला मेसेज करून प्रवेशाची माहिती दिली. व्हिडिओ कॉलवर ती अथर्वसोबत गाडीत असल्याचे दिसले, तेव्हा आईने तिला लवकर घरी येण्यास सांगितले.
मात्र, खरी धक्कादायक घटना संध्याकाळी सात वाजता घडली.
आईने तिला दोन वेळा फोन केला असता तिने तो उचलला नाही. शेवटी आईने अथर्वच्या मोबाईलवर कॉल केला. तेव्हा मुलीने आईला जे सांगितले, ते ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अथर्व मला त्याच्या घरी घेऊन जात आहे, त्याला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला एक गोळी खाण्यास देणार आहे, असे तिने सांगितले. हे ऐकून घाबरलेल्या आईने तिला तिथे न जाता तत्काळ घरी येण्यास बजावले. दरम्यान रात्री नऊ वाजता तिने जेवत असल्याचा मेसेज केला, पण त्यानंतर आईच्या पुढील मेसेजवर तिचा कोणताही रिप्लाय आला नाही.
रात्री दहा वाजता आईने पुन्हा फोन लावला, तेव्हा तो फोन अथर्वने उचलला. तिला अचानक चक्कर आली आहे, असे त्याने त्रोटक उत्तर दिले. काही वेळाने तो स्वतः गाडी घेऊन मुलीच्या घरी पोहोचला आणि त्याने सांगितले की, तिला आगोदर बारामतीतील दोन खाजगी रुग्णालयात आणि शेवटी शासकीय रुग्णालयात नेले आहे. आई घाबरलेल्या अवस्थेत रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी शासकीय रुग्णालयात मध्ये पोहोचली. तिथे तिची लाडकी लेक स्ट्रेचरवर निपचित पडली होती. तिची प्राणज्योत मालवली होती.
अथर्वने पोलिसांना आणि आईला सांगितले की, तो तिला त्याच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला होता आणि तिथे आमच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिला अचानक चक्कर आली. पण, आईच्या मनात तो संध्याकाळी सात वाजताचा फोन आणि मैत्रिणीने सांगितलेली गोळ्यांची माहिती सतत घुमत होती.
या गंभीर संशयावरून आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये अथर्व मेहन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते मृत्यूचे खरे कारण शोधण्याचे.
तिने खरंच ती गोळी खाल्ली होती का?
ती गोळी कोणती होती?आणि तिचा तरुणीच्या मृत्यूशी काय संबंध आहे?
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय, रासायनिक आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तरुणीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असली, तरी तिच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत मात्र सस्पेन्स अजूनही कायम आहे…
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा