बारामती: तालुक्यातील पणदरे येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखे शेजारील एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १४ लाख १९ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.४२ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत बँक ऑफ इंडिया, पणदरे शाखेचे शाखा प्रबंधक तुषार लिलाधर पाटील (वय ३८, रा. करण आयकॉन, बारामती) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी पणदरे येथील बँकेच्या लगतच्या खोलीत प्रवेश करून तेथील पर्टो कंपनीचे एटीएम मशीन आणि हिताची कंपनीचे कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) गॅस कटरच्या साहाय्याने फोडले.
या धाडसी चोरीमध्ये पर्टो एटीएममधील शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटा अशी एकूण ११ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रोकड आणि हिताची सीडीएम मशीनमधील २ लाख २६ हजार ४०० रुपये अशी मिळून एकूण १४ लाख १९ हजार १०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेली आहे. तसेच गॅस कटरचा वापर केल्याने दोन्ही मशीनचे मोठे नुकसान करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच माळेगांव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फिर्यादीवरून माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास माळेगांव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास साळवे करत आहेत. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा