कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
सोमेश्वर कारखान्यात अजितदादांच्या ‘विकासपुरुष पॅनेल’चा २१-० ने दणदणीत विजय; सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि सभासदांचे आभार

0
9
5
9
1
9
बारामती / सोमेश्वरनगर: श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२६-२०३१) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने सर्वच्या सर्व २१ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या घवघवीत यशानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी सर्व सभासद मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले असून, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृतरीत्या जाहीर केलेल्या ‘सोमेश्वर साखर कारखाना अंतिम निकालानुसार गटावर विजयी झालेल्या उमेदवारांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
उत्पादक सभासद प्रतिनिधी निंबूत-खंडाळा गट क्र १: या गटातून प्रमोद भगवानराव काकडे यांनी १४९८१ मते मिळवून विजय मिळवला. प्रियराज उर्फ अभिजित सतीशराव काकडे हे १४०४९ मते मिळवून विजयी झाले. तसेच, वसंतराव रामराव दगडे यांनी १३९९९ मते घेत विजय संपादन केला.
उत्पादक सभासद प्रतिनिधी मुरुम-वाल्हा गट क्र २: या गटातून राजवर्धन शिवाजीराव शिंदे यांनी १४०१५ मते मिळवून विजय नोंदवला. रुषीकेश (ऋषिकेश) शिवाजी गायकवाड यांना १३९४१ मते मिळाली आणि ते विजयी ठरले. विक्रम आनंदराव भोसले हे १३८५४ मते मिळवून विजयी झाले.
उत्पादक सभासद प्रतिनिधी होळ-मोरगाव गट क्र ३: या गटातून मकरंद चंद्रकांत सस्ते यांनी सर्वाधिक १४३१६ मते मिळवत विजय मिळवला. मनिषा आनंदकुमार होळकर यांनी १४२२६ मते मिळवून विजय संपादन केला. रविंद्र जयवंतराव भापकर हे १२०७५ मते मिळवून विजयी ठरले.
उत्पादक सभासद प्रतिनिधी कोऱ्हाळे-सुपा गट क्र ४: या गटातून अक्षय धनंजय खलाटे १४५०० मते मिळवून विजयी झाले. राजेंद्र हरिभाऊ बोरकर यांनी १३८९६ मते मिळवत विजय मिळवला. सुनिल नारायण भगत यांना १३७४६ मते मिळाली आणि ते विजयी झाले.
उत्पादक सभासद प्रतिनिधी मांडकी जवळार्जुन गट क्र ५: या गटातून सतीश संपत जगताप यांनी १४६४७ मते घेऊन विजय मिळवला. उत्तम महादेव धुमाळ हे १३८७० मते मिळवून विजयी झाले. सुधाकर ज्ञानोबा टेकवडे यांनी १३८१९ मते मिळवत विजय संपादन केला.
ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था: या गटातून संग्राम तानाजी सोरटे यांनी ९३ मते मिळवून एकतर्फी विजय मिळवला.
महिला राखीव प्रतिनिधी: या प्रवर्गातून प्रणिता मनोज खोमणे यांनी १४३५६ मते मिळवून विजय मिळवला. तसेच, छबुताई अंकुश नाझीरकर या १३५८३ मते मिळवून विजयी ठरल्या.
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी: या गटातून व्दारकोजीराव गुलाब साळवे यांनी १४०६४ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी: या गटातून शैलेंद्र पंढरीनाथ रासकर हे १४५७७ मते मिळवून विजयी झाले.
भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी: या गटातून अशोक चंद्रकांत धायगुडे यांनी १४५४० मते मिळवत विजय संपादन केला.

या अभूतपूर्व विजयानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या की,
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी तब्बल ३४ वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी योगदान दिले. कारखान्याशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते, सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने आणि सहकार क्षेत्रात त्यांनी जपलेला वारसा या विजयाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला आहे. दादांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या निवडणुकीत सभासद शेतकरी बांधव-भगिनींनी दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत हीच आमची खरी ताकद असल्याचे सुनेत्रावहिनी पवार यांनी सांगितले.
सर्वांना सोबत घेऊन सभासदांचे हित जपणे, शेतकऱ्यांची समृद्धी साधणे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीला अधिक गती देणे यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विजय केवळ आनंदाचा क्षण नसून, सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी आहे. सभासद शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे, हेच आमचे ध्येय राहील, अशी ठाम भावना त्यांनी व्यक्त केली.




