नवी दिल्ली/छत्रपती संभाजीनगर : क्रीडा क्षेत्रात राज्यासह देशपातळीवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणारा राष्ट्रीय खेळाडू हर्षवर्धन हेमंत पाटील याने आता व्यक्तिमत्व विकास क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. देशातील प्रतिष्ठित ‘सूर्या फौंडेशन’च्या वतीने आयोजित राष्ट्रीय शिबिरांसाठी हर्षवर्धनची वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘ट्रेनर’ (प्रशिक्षक) म्हणून निवड झाली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख श्री. हेमंत पाटील यांचा तो सुपुत्र असून, त्याच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मैदानी खेळातील ‘षटकार’ ते राष्ट्रीय ट्रेनर
हर्षवर्धन हा मूळचा एक राष्ट्रीय दर्जाचा ॲथलीट (National Athlete) आहे. नुकत्याच क्रीडा भारतीच्या वतीने नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत त्याने पदकांचा अक्षरशः ‘षटकार’ लगावला होता. या स्पर्धेत त्याने १००, २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकांची हॅट्ट्रिक साधली होती. इतकेच नव्हे तर भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक या प्रकारांतही त्याने यश मिळवत एकूण ६ पदकांची कमाई केली होती. ‘ओंकार प्रशालेचा’ विद्यार्थी असलेल्या हर्षवर्धनला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्यातील हीच शिस्त आणि जिद्द आता त्याला प्रशिक्षक पदापर्यंत घेऊन गेली आहे.
कठोर प्रशिक्षणातून ‘आयडियल ट्रेनर’ पदी निवड
सूर्या फौंडेशनच्या निवडीसाठी हर्षवर्धनने दिल्लीतील झिंझोली येथील ‘सूर्या साधना स्थळी’ आयोजित केलेले ‘ATC-2025’ हे अत्यंत कठीण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. तसेच उत्तराखंडमधील नैनिताल येथील प्रेरक यात्रेतही त्याने सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्यातील नेतृत्वगुण, उत्तम वक्तृत्व, शिस्त आणि कौशल्याची दखल घेत फौंडेशनने २०२६ च्या उन्हाळी शिबिरांसाठी त्याची ‘आयडियल ट्रेनर’ (Ideal Trainer) म्हणून नियुक्ती केली आहे. इतक्या कमी वयात ही जबाबदारी मिळवणारा तो मोजक्या युवकांपैकी एक ठरला आहे.
झिंझोली (दिल्ली) येथे देणार धडे
येत्या मे आणि जून २०२६ दरम्यान दिल्लीतील झिंझोली येथे देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिबिरांमध्ये हर्षवर्धन मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणार आहे. तो खालील सत्रांमध्ये मार्गदर्शन करेल:
* PDC (कॅम्प-१): १६ मे ते २६ मे २०२६
* PDC (कॅम्प-२): २८ मे ते ७ जून २०२६
* APDC + SSS: ९ जून ते २३ जून २०२६
हर्षवर्धनच्या या यशाबद्दल सूर्या फौंडेशनचे उपाध्यक्ष हेमंत शर्मा आणि युवा विकास प्रमुख भारत यांनी पत्राद्वारे त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. ही निवड म्हणजे त्याच्यावर असलेल्या उत्तम संस्कारांचे आणि क्रीडा क्षेत्रातील त्याच्या मेहनतीचे फळ असल्याचे बोलले जात आहे. एकाच वेळी राष्ट्रीय खेळाडू आणि आता राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक अशी दुहेरी कामगिरी केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा