बारामती: पोलिसांशी संबंध असल्याचे भासवून आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एका दुकानदाराकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी पोलीस खात्यातून बडतर्फ झालेला कर्मचारी असून, त्याने वडगाव निंबाळकर येथील पोलीस उपनिरीक्षकाचे नाव वापरून ही खंडणी उकळली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद नामदास (रा. विकासनगर, वाणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विजय हिंदुराव साळुंखे (वय ३६ वर्षे, रा. वाघळवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणेवाडी येथील हरणाई चौकात विजय साळुंखे यांचे विजय किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. आरोपी विनोद नामदास याने १७ जुलै आणि २० जुलै रोजी साळुंखे यांच्या दुकानात जाऊन त्यांना धमकावले. आपले पोलिसांशी घनिष्ठ संबंध असल्याचे भासवून त्याने साळुंखे यांना सांगितले की, त्यांच्यावर करंजेपुल पोलीस दूरक्षेत्र येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यात त्यांना लवकरच अटक होईल. ही भीती दाखवून त्याने साळुंखे यांच्याकडून १२ हजार रुपये खंडणी उकळली. त्यानंतरही तो पुन्हा पैशांची मागणी करून अधिक खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत होता.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी विनोद नामदास याने वडगाव निंबाळकर येथील एका पोलीस उपनिरीक्षकाचे (पीएसआय) नाव वापरून या पैशांची मागणी केली होती. तसेच, यापूर्वीही त्याने अशीच भीती दाखवून फिर्यादीकडून तब्बल २५ हजार रुपये उकळले होते. आरोपी नामदास हा पूर्वी पोलीस खात्यात नोकरीस होता, मात्र त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी विजय साळुंखे यांच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (६)(७), ३५१ (२)(३), आणि ३१९ नुसार आरोपी विनोद नामदास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार महेश पन्हाळे यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिपक वारुळे हे करत आहेत. हा वर्दी रिपोर्ट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात रवाना करण्याची तजवीज पोलिसांनी ठेवली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा