Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

ज्या लोकांना दादांनी भरभरून दिले तेच लोक आता स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळे झाले आहेत, सोमेश्वर कारखाना पुन्हा एकदा शरद पवारांच्या ताब्यात देण्याचे आवाहन.युगेंद्र पवार

शरद पवारांचा पुरंदर-बारामती दुष्काळी दौरा: कोऱ्हाळे बुद्रुकमध्ये साहेब न थांबल्याने युगेंद्र पवारांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; सोमेश्वर कारखान्यावरून विरोधकांवर निशाणा.

0 9 3 3 4 5

बारामती/कोऱ्हाळे बुद्रुक : देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान ते कोऱ्हाळे बुद्रुक येथील ‘कठीण पूल’ परिसरात आले असता, परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि आगामी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने त्यांच्या प्रतीक्षेत चौकात थांबले होते. मात्र, पुढील कार्यक्रमाला उशीर होत असल्याने शरद पवार तेथे न थांबताच पुढे निघून गेले. साहेब पुढे गेल्याने उपस्थित नागरिकांमध्ये काहीशी निराशा होती, मात्र विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी तातडीने परिस्थिती हाताळत लोकांसाठी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आणि उपस्थित शेतकरी व सभासदांशी संवाद साधून त्यांना आश्वस्त केले.

या अनौपचारिक सभेच्या सुरुवातीला पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. सतीश मामा खोमणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी पुरंदरमधील जिरायत भाग आणि मुढाळे परिसरातील भीषण दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य मांडले. ‘१६ फाटा’ परिसरातील पाण्याचा गंभीर प्रश्न आणि रात्रीच्या वेळी वस्त्यांवर जाऊन पाहिलेली पाण्याची भीषण टंचाई त्यांनी सांगितली. तसेच, सध्या अनेक शेतकरी दुधाच्या व्यवसायावर अवलंबून असून, या दुष्काळात लाखो रुपयांच्या महागड्या गाई जगवायच्या कशा, हा मोठा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. शरद पवार साहेबांनी नेहमीच दुष्काळात शेतकऱ्यांना भक्कम साथ दिली आहे, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

त्यानंतर युगेंद्र पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. शरद पवार साहेब का थांबू शकले नाहीत, याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “सकाळपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात साहेबांनी पुरंदरमधील परिंचे, जेऊर, मांडकी अशा १५ ते २० गावांना भेटी दिल्या. या सर्व धावपळीत दुपारचे अडीच वाजले तरी साहेबांनी जेवण केलेले नव्हते. त्यांच्या प्रकृतीची आणि वेळेची काळजी घेत ते पुढील कार्यक्रमासाठी गोविंद बागेकडे रवाना झाले.”

भाषणादरम्यान युगेंद्र पवारांनी बारामतीतील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, बारामतीत गुन्हेगारी प्रचंड वाढली असून पूर्वी महिलांना रात्री बाहेर फिरताना जी सुरक्षितता वाटायची, ती आता राहिलेली नाही. महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात जाऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून, बारामती पुन्हा सुरक्षित करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत विहिरी आणि तलाव खोलीकरणासाठी मशीन उपलब्ध करून दिले जात असून, शेतकऱ्यांना त्यासाठी फक्त डिझेलचा खर्च द्यावा लागत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोमेश्वर कारखान्यावरून अजितदादांच्या समर्थकांवर टीका आगामी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना युगेंद्र पवारांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. त्यांनी स्पष्टपणे मान्य केले की, यापूर्वी अजित दादांनी या कारखान्यावर बारकाईने लक्ष ठेवून तो कर्जातून बाहेर काढला होता आणि उत्तम प्रकारे चालवला होता. मात्र, ज्या लोकांना दादांनी भरभरून दिले आणि पदे दिली, तेच लोक आता स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळे झाले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

सोमेश्वर कारखाना पुन्हा एकदा शरद पवारांच्या ताब्यात देण्याचे आवाहन करत युगेंद्र पवार म्हणाले, “यूपी, बिहार, पंजाब अशा देशभरातील सहकार क्षेत्रातील नेते ‘व्हीएसआय’मध्ये (VSI) साहेबांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे साहेबांनी लक्ष घातल्यास हा कारखाना नक्कीच प्रगतीच्या शिखरावर जाईल.”

सोमेश्वरच्या भवितव्यासाठी निवडणुकीत साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलातर, गुणवत्तेवर नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, कारभारात पारदर्शकता आणण्याचे, साखरेचा दर्जा सुधारून टनाला जास्त भाव देण्याचे आणि कामगारांचे हित जोपासण्याचे देखील आश्वासन युगेंद्र पवार यांनी दिले.विशेष म्हणजे, कारखान्यातील नोकरभरतीमध्ये कोणाचा पुतण्या किंवा भाचा न पाहता (वशिलेबाजी न करता), सर्वसामान्य सभासदांच्या होतकरू आणि उच्चशिक्षित मुलांना मेरीटवर संधी दिली जाईल, अशी मोठी ग्वाही त्यांनी दिली.

शेवटी, माळेगाव कारखान्याची अवस्था सध्या खराब झाल्याचे आणि तिथे डिस्टिलरी सील करून प्रशासक आणल्याचे उदाहरण देत, तसेच छत्रपती कारखान्याची स्थितीही चांगली नसल्याचे सांगत सोमेश्वरच्या भवितव्यासाठी येत्या निवडणुकीत साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले. साहेबांच्या अनुपस्थितीत युगेंद्र पवारांनी अत्यंत प्रभावीपणे सभासदांना विश्वासात घेतल्याने राजकीय वर्तुळात या सभेची मोठी चर्चा रंगली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे