Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगाव निंबाळकरमध्ये मानवी वस्तीतील भंगार दुकानाला भीषण आग; मोठा अनर्थ टळला, पण प्रशासनाला जाग कधी येणार?

नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या भंगार माफियांवर कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा स्थानिकांचा इशारा

0 7 3 3 3 7

वडगाव निंबाळकर : नीरा-बारामती रस्त्यालगत वडगाव निंबाळकर येथील माळीवस्तीत असलेल्या एका भंगार दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. झोपडपट्टी आणि मानवी वस्तीच्या अगदी मध्यभागी असलेल्या या दुकानाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण वस्तीचा जीव टांगणीला लागला होता. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेने प्रशासनाच्या नाकर्तेपणावर आणि मानवी वस्तीत चालणाऱ्या या जीवघेण्या व्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास सर्वत्र सामसूम असताना या भंगार दुकानातून आगीचे लोळ उठू लागले. काही क्षणांतच आगीने एवढे प्रचंड रौद्ररूप धारण केले की आजूबाजूचा परिसर उजळून निघाला. आगीची तीव्रता लक्षात येताच काही जागरूक नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आजूबाजूच्या झोपड्या आणि बंगल्यांचे दरवाजे अक्षरशः बडवून लोकांना झोपेतून जागे केले.
वेळ न दवडता घरातील गॅस सिलेंडर तातडीने बाहेर काढण्यात आले. जर हे सिलेंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते, तर आज वडगाव निंबाळकरमध्ये मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले असते आणि शेकडो घरे बेचिराख झाली असती.

ही आग केवळ ज्वालांपुरती मर्यादित नव्हती, तर त्यातून निघणाऱ्या काळ्याकुट्ट आणि विषारी धुराचे लोट थेट आजूबाजूच्या घरांमध्ये घुसत होते. या धुरामुळे घरात गाढ झोपलेली लहान मुले आणि वृद्ध नागरिक गुदमरून जाण्याची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. वेळीच लोकांना जागे केले नसते, तर अनेक निष्पाप जीव या धुरानेच गुदमरून मृत्युमुखी पडले असते. हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे.

ही आग नैसर्गिक नसून भंगार माफियांनी केलेल्या निष्काळजीपणाचा परिपाक असल्याचा संशय आहे. या गोदामाच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात भंगार साठवले जाते. भंगारात आणलेल्या रबरी वायर्स जाळून त्यातून लोखंड, ॲल्युमिनियम किंवा तांब्याच्या तारा काढण्याचा अत्यंत घातक आणि बेकायदेशीर प्रकार येथे उघडपणे चालतो.
तारा काढल्यानंतर उरलेली आग पूर्णपणे न विझवता तशीच बेजबाबदारपणे सोडून दिली जाते. याच निखाऱ्यांमुळे मध्यरात्री आगीने भडका घेतला असावा, असा अंदाज स्थानिक व्यक्त करत आहेत.

चंद्रावर जाणारे तंत्रज्ञान आपण विकसित केले असले तरी, वस्तीत वायर्स जाळणाऱ्या या प्रवृत्तीला प्रशासन का रोखू शकत नाही? हा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

आज केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली, पण उद्या अशीच आग लागली आणि त्यात निष्पाप लोकांचे बळी गेले तर त्याला जबाबदार कोण? मानवी वस्तीत आणि झोपडपट्टीच्या अगदी खेटून असे स्फोटक आणि ज्वालाग्राही भंगार गोळा करून ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिलीच कशी?
हे भंगार गोदाम मानवी वस्तीसाठी आणि येथील इमारतींसाठी टाईम बॉम्ब बनले आहे. स्थानिक नागरिकांच्या जिवाचा विचार करून हे भंगार गोडाऊन मानवी वस्तीतून तात्काळ हद्दपार करण्यात यावे, अशी स्थानिकांची एकमुखी मागणी आहे.
संबंधित प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन या बेकायदेशीर आणि धोकादायक भंगार दुकानावर लवकरात लवकर कारवाई करावी. प्रशासनाने एखादा बळी जाण्याची वाट पाहू नये. जर त्वरित कारवाई झाली नाही, तर आम्ही सर्व स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा थेट आणि सडेतोड इशारा आता संतप्त नागरिकांनी दिला आहे.
आता या भयानक घटनेनंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का? की अजून एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे