Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक

‘खाकी’चा धाक अन् सुरक्षिततेचा विश्वास! वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ‘हायटेक’ गस्तीने गुन्हेगार भूमिगत; ‘वडगाव पॅटर्न’ची जोरदार चर्चा

0 7 9 2 1 9

बारामती : एखाद्या गावात पोलिसांची गाडी आली की पूर्वी नागरिकांच्या मनात भीतीची पाल चुकचुकत असे; मात्र, वडगाव निंबाळकर हद्दीत आता हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. चौकाचौकात, सराफ बाजारात आणि मंदिर परिसरात दिवसातून दोनदा सायरन वाजवत येणारी पोलिसांची गाडी पाहून व्यापारी आणि सामान्य नागरिक आता सुटकेचा निश्वास टाकत आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘सुरक्षा अभियाना’ला वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हद्दीत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडगाव निंबाळकर पोलिसांनी हद्दीत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. केवळ गुन्हे घडल्यावर तपास करण्यापेक्षा, गुन्हे घडूच नयेत यासाठी राबविलेला ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ यशस्वी ठरत आहे.

 * संवेदनशील ठिकाणे रडारवर: सराफ पेढ्या, बँका, मंदिरे, मशिदी, आणि बाजारतळ अशी २५ ते ३० संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तिथे दिवसातून दोन वेळा ‘फिजिकल व्हिजिट’ (प्रत्यक्ष भेट) दिली जात आहे.

 * दोन पथके, दोन मार्ग: पोलिसांच्या दोन स्वतंत्र चारचाकी गाड्या रात्रभर हद्दीत गस्त घालत आहेत. पहिली गाडी ‘नीरा-मुर्टी-मगरवाडी’ पट्ट्यात, तर दुसरी गाडी ‘वडगाव-कोऱ्हाळे-शिरष्णे’ मार्गावर निगराणी ठेवून आहे.

केवळ गस्त घालून पोलीस थांबले नाहीत, तर पोलीस ठाण्यातील प्रशासकीय कामातही मोठी झेप घेतली आहे.

‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ ॲपच्या माध्यमातून पोलीस आता थेट जनतेशी जोडले गेल्याने गोपनीय माहिती मिळणे सोपे झाले आहे.

सराफ व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

“दिवाळीपासून पोलिसांची गस्त आणि कार्यपद्धती बदलली आहे. पेठेत दिवसा आणि रात्रीही पोलीस वावरत असल्याने गुन्हेगारांवर आपोआप वचक बसला आहे. यामुळे आमचे कर्मचारी आणि आम्ही आता निर्धास्तपणे व्यवसाय करत आहोत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सुरक्षिततेची भावना वाढली आहे.”

– किरण आळंदीकर (अध्यक्ष, बारामती सराफ असोसिएशन)

आठवडे बाजारावर विशेष ‘वॉच’

गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस आठवडे बाजारात कधी गणवेशात, तर कधी साध्या वेशात वावरत आहेत. करंजेपूल आणि सोमेश्वर कारखाना परिसरातही गस्त वाढवण्यात आली आहे.

नागरिकांनी आपल्या परिसरात काहीही संशयास्पद आढळल्यास घाबरून न जाता किंवा अफवांवर विश्वास न ठेवता तात्काळ ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. पोलीस काही मिनिटांत मदतीला पोहोचतील, असा विश्वास प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील यांनी व्यक्त केला आहे.

3/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे