पुरंदर : तालुक्यातील गराडे ढोणेवस्ती येथून १७ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ म्हशी आणि ९ गाई चोरीला गेल्याची मोठी घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भिवरी येथील संतोष बापूसाहेब कटके यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कटके यांचा शेती आणि दुग्ध व्यवसाय आहे. १३ जुलै रोजी रात्री १० वाजता कटके हे त्यांच्या गोठ्यातील नेहमीचे काम आटोपून घरी गेले होते. त्यांच्या गोठ्यात एकूण १२० गाई आणि म्हशी होत्या. दुसऱ्या दिवशी १४ जुलै रोजी सकाळी ते त्यांच्या भावासोबत वीर येथे दर्शनासाठी गेले असता, त्यांना महेंद्र जगदाळे यांनी फोन करून माहिती दिली की पहाटे ५ वाजल्यापासून गोठ्यातून काही जनावरे कमी दिसत आहेत. त्यांनी तातडीने गोठ्यावर जाऊन खात्री केली आणि आजूबाजूला शोध घेतला, परंतु जनावरे कुठेही मिळून आली नाहीत.
चोरीला गेलेल्या जनावरांमध्ये मुऱ्हा जातीच्या ७ म्हशी, जाफराबादी जातीच्या २ म्हशी आणि एचएफ जातीच्या ९ जर्सी गाई अशा एकूण १८ जनावरांचा समावेश आहे. या सर्व जनावरांची अंदाजे किंमत १७ लाख १० हजार रुपये इतकी आहे.
याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा