गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
१२ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांच्या ‘पहाटेच्या सापळ्या’ला मोठे यश
पोलीस हवालदार उदय टापरे यांची धडाकेबाज कामगिरी; आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी

0
8
6
6
0
7
बारामती : गेल्या १२ वर्षांपासून न्यायालयाच्या पकड वॉरंटला (NBW) गुंगारा देणाऱ्या एका फरार आरोपीला जेरबंद करण्यात बारामती शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलीस हवालदार उदय टापरे यांनी अत्यंत अचूक नियोजन करत, पहाटेच्या वेळी सापळा रचून या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सागर लक्ष्मण जाधव (रा. कसबा, बारामती) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी सागर जाधव याच्यावर ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, १८८१’ च्या कलम १३८ अन्वये चेक बाऊन्स (चेक अनादर) प्रकरणी न्यायालयात खटला दाखल होता. हे प्रकरण सन २०१४ पासून प्रलंबित होते. वारंवार सूचना देऊनही तो न्यायालयात हजर न राहिल्याने, न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र पकड वॉरंट जारी केले होते. मात्र, तो सातत्याने जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या वॉरंटची बजावणी करण्याचे आव्हान बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार उदय टापरे यांनी स्वीकारले. त्यांनी स्वतःच्या खबऱ्यांमार्फत आरोपीच्या हालचाली आणि त्याच्या सध्याच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती मिळवली. आरोपी पहाटेच्या वेळी घरी येण्याची दाट शक्यता असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, टापरे यांनी त्याच्या घराजवळ अत्यंत गुप्तपणे सापळा लावला.
आज सकाळी हा आरोपी घरी आला असता, त्याला पोलिसांची चाहूल लागली. त्याने तत्काळ तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र हवालदार उदय टापरे यांनी प्रसंगावधान राखून त्याचा पाठलाग केला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर आरोपीला तातडीने माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मा. न्यायालयाने प्रकरणातील वस्तुस्थिती आणि १२ वर्षांचा प्रलंबित कालावधी लक्षात घेऊन, आवश्यक कायदेशीर आदेश पारित केले. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी सागर जाधव याची आता थेट पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
”वॉरंट जुने असो अथवा नवीन, बजावणी होणारच!”
या कारवाईतून बारामती शहर पोलिसांनी गुन्हेगारांना एक स्पष्ट आणि कडक संदेश दिला आहे की, न्यायालयीन वॉरंट काढल्यानंतर जागा बदलून किंवा पोलिसांपासून लपून राहून कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही.
पोलीस हवालदार उदय टापरे हे अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या आणि प्रलंबित वॉरंटच्या बजावणीसाठी विशेष ओळखले जातात. पहाटेच्या वेळेत अचूक सापळा लावून कारवाई करण्याची त्यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. त्यांच्या या चिकाटीचे आणि कर्तव्यतत्परतेचे पोलीस दल आणि नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे.



