गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका; मध्य प्रदेशातील विदेशी मद्यसाठ्यासह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
7
9
2
2
5
बारामती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवत असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारामती तालुक्यात एक मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत मध्य प्रदेश बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ६ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे पथक गस्तीवर असताना, त्यांना अवैध मद्य वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बारामती तालुक्यातील मौजे शिरवली गावच्या हद्दीत, सांगवी–बारामती रोडवरील माळेगाव फाटा येथे सापळा रचला.
संशयास्पद रित्या येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर (MH-01-BF-9165) वाहनाला थांबवून झडती घेतली असता, त्यात विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. विशेष म्हणजे हे मद्य केवळ मध्य प्रदेशात विक्रीस परवानगी असलेले होते आणि महाराष्ट्रात त्याच्या विक्रीवर व वाहतुकीवर बंदी आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
तपासणी दरम्यान वाहनातून एकूण २० बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये खालील ब्रँड्सचा समावेश आहे:
* रॉयल स्टॅग व्हिस्की (१८० मिली): ११ बॉक्स
* इम्पेरियल ब्ल्यू (१८० मिली): ४ बॉक्स
* मॅकडॉवेल नं. १ (१८० मिली): ५ बॉक्स
या कारवाईत मद्यसाठा आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ६ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल विभागाने ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी बेकायदेशीर मद्य वाहतूक करणाऱ्या रामसिंह मोहबतसिंह राजपूत आणि महिपालसिंह राजसिंह राजपूत या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, मनोज होलम, गिरीशकुमार कर्चे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव तसेच जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे आणि टी. एस. काळे यांच्या पथकाने केली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास श्री. गिरीशकुमार कर्चे करीत असल्याची माहिती निरीक्षक शहाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.





