बारामती: बारामतीतील सूर्यनगरी परिसरात एका एकोणीस वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविष्कार अमोल ढोले (वय 19 वर्षे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला समजल्याने आलेल्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस माहितीत समोर आले आहे.

बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी मयत नोंद (रजि. नं. 85/2026 BNSS 194) करण्यात आली आहे. अविष्कार ढोले हा मूळचा कुरवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून, तो सध्या बारामतीतील सूर्यनगरी, लेन नं 5 येथील जयश्री अपार्टमेंटमध्ये मित्रांसोबत राहत होता. त्याचा मित्र सुजित रवी घोडके (वय 19 वर्षे) याने या संदर्भात पोलिसांत खबर दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, अविष्कारचे त्याच्या मूळ गावाकडील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाबाबत महिलेच्या पतीला समजले होते आणि त्याने तिला घराबाहेर काढले होते. या सर्व प्रकारामुळे अविष्कार प्रचंड मानसिक तणावाखाली होता. याच नैराश्यातून दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 15:30 ते 15:45 वाजेच्या सुमारास अविष्कारने स्वतःच्या राहत्या रूममध्ये, स्वतःकडे असलेल्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून घेतली.
गोळी झाडल्याचा आणि त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मित्र सुजित घोडके आणि अक्षय थोरात यांनी बेडरूममध्ये धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अविष्कारला त्यांनी तातडीने वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 06:00 वाजता त्याचे निधन झाले.
या प्रकरणी मयताच्या मित्राने कोणताही संशय व्यक्त केलेला नसून, कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम हे पुढील तपास करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा