Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कोयत्याची दहशत आणि खाकीचा दणका! बारामती तालुका पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या लुटारूंच्या मुसक्या

0 5 3 1 8 6

बारामती : रात्रीची वेळ… 

निर्जन रस्ता… 

आणि अचानक अंधारात चमकणारी धारदार कोयत्याची पाते! भिगवण-बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा येथे शुक्रवारी रात्री असाच एक थरार घडला. प्रवाशांना लुटणाऱ्या आणि कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी अक्षरशः सिनेस्टाईल पाठलाग करून पर्दाफाश केला आहे.

शुक्रवारी (दि. ७) रात्रीचे साडेआठ वाजले होते. विश्वराजे पाटील (वय १८) आणि त्यांचे मित्र मारुती सुझुकी कॅरी गाडीतून प्रवास करत होते. गाडी जैनकवाडी फाट्याजवळ आली असता, अचानक अंधारातून ६ ते ७ जणांची टोळी रस्त्यावर आली. काही कळायच्या आतच त्यांनी गाडी अडवली. हातात लोखंडी रॉड आणि कोयते पाहून प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

लुटारूंनी गाडीच्या काचा फोडल्या आणि आरडाओरडा सुरू केला. विश्वराजे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडण्यात आले. भीतीचे वातावरण निर्माण करून लुटारूंनी फिर्यादीची स्कायबॅग, मोबाईल, पॉवर बँक, एटीएम कार्ड आणि रोख रक्कम असा एकूण १२,०२० रुपयांचा ऐवज लुटला आणि पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच होमगार्ड जवान सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना अलर्ट केले. यादव यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने भिगवण, दौंड आणि यवत पोलिसांना अलर्ट केले.

लुटारू पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. केडगाव चौफुला-सुपा रोडवर हा पाठलाग एखाद्या ॲक्शन चित्रपटाप्रमाणे रंगला. मोटारसायकल आणि रिक्षामधून पळणाऱ्या आरोपींना घेरण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. या झटापटीत दोन आरोपी जाळ्यात अडकले, तर काही अंधाराचा फायदा घेऊन पळाले.

पण, पोलीस इथेच थांबले नाहीत. पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेत असतानाच माहिती समोर आली की, या टोळीने कुरकुंभ येथील पेट्रोल पंपावरील सेल्समन रवींद्र खडके यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला होता. अखेर बारामती पोलिसांनी जिद्द सोडली नाही आणि पळालेल्या तिघांपैकी दोघांना पुन्हा शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी या धाडसी कारवाईत कृष्णा राजू मोरे, रुपेश सुरेश आडवाल, संकेत अनंत शिलते आणि ईश्वर महादेव मिसाळ (सर्व रा. पुणे व कात्रज परिसर) या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले तीन धारदार कोयते, बेसबॉल रॉड आणि चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१० आणि ३११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील एक आरोपी ईश्वर महादेव मिसाळ याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा एक गुन्हा यापूर्वी दाखल आहे..

वरील सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बारामती यांनी  तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कामगिरीचे ‘खरे’ शिलेदार

ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

     बारामती तालुका पोलीस पथक

 * पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

 * सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, अमोल कदम

 * पोलीस अंमलदार: मनोज पवार, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, राहुल लांडगे

 * भिगवण पोलीस स्टेशनचे महेश उगले

 * होमगार्ड जवान सुमित सूर्यवंशी, अजिंक्य नाळे

       मदतीसाठी धावलेले इतर पोलीस पथक

या कामगिरीत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, कुरकुंभ चौकीचे श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे आणि यवतचे पोलीस अंमलदार गुरु गायकवाड यांची मोलाची मदत झाली.

या घटनेत केवळ पोलीसच नव्हे, तर स्थानिक नागरिकांनीही या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आपले कर्तव्य चोख बजावले. यात प्रामुख्याने खालील व्यक्तींनी सहकार्य केले,

 * बारामती: ऋषिकेश पतंगे

 * निरगुडे: पोलीस पाटील अशोक राजे भोसले, अमर राजे भोसले

 * कुरकुंभ: पोलीस पाटील विनोद शितोळे, गोरख अडसुळ, सूरज साळुंखे, अभि दहाळे, सुनील पवार, उमेश सोनवणे, अमोल झगडे, मयूर पवार, स्वप्निल शितोळे, किशोर गिरामे.

“कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीवर आम्ही अत्यंत नियोजनबद्ध कारवाई केली आहे. गुन्हेगारांनी कायद्याचा धाक ठेवावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”

– सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती

“रस्त्यावर काही संशयास्पद हालचाली दिसल्यास घाबरून जाऊ नका, तात्काळ ११२ वर कॉल करा. पोलीस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत.”

– गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे