बारामती : स्वातंत्र्य विद्या मंदिर, वडगाव निंबाळकर येथे नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी सीएपीएफ) परीक्षेत देशात ३२ वा क्रमांक मिळवून असिस्टंट कमांडंट ( वर्ग १) पदी निवड झालेल्या कुमार अथर्व प्रदीप पवार यांचा विशेष सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

याप्रसंगी सत्कारमूर्ती अथर्व पवार यांनी आपल्या शालेय जीवनापासून ते युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवेपर्यंतचा आपला संपूर्ण प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसमोर थोडक्यात उलगडला. त्यांचा हा प्रवास आणि मार्गदर्शन समोर बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले, ज्यामुळे मुलांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली. या आनंददायी क्षणी अथर्व यांचे वडील आणि भाऊ देखील आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा, पुणे जिल्हा परिषदेच्या (जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती) विद्यमान सदस्या सौ. रोहिणीताई कदम (ढोले) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य विद्या मंदिरमधील हा आपला पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगत, मी हे उच्चशिक्षित असून मी स्वतः स्पर्धा परीक्षा दिले आहेत या परीक्षा कशा होतात यातून अधिकारी कसे घडतात व त्यांचा प्रशासनात काय भूमिका असते याविषयी माहिती दिली आणि या शाळेतीलच नव्हे तर आपल्या संपूर्ण मतदारसंघाच्या प्रत्येक गावातील किमान दोन विद्यार्थ्यांनी तरी उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या विशेष सत्कार सोहळ्याला बारामती पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री बाबा चोरमले, जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य श्री जितेंद्र पवार, वडगाव निंबाळकरचे प्रशासक सरपंच तथा आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त श्री सुनील ढोले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुशीलकुमार अडागळे उपस्थित होते. यासोबतच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद किर्वे, व सुनिल जाधव,भानुदास भोईटे, वैशालीताई जाधव, एनडीआरएफचे जवान रोहित माने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे रणजित जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
सदर सत्कार समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री मोहन गायकवाड सर यांनी केले, तर प्रशालेचे प्राचार्य श्री हेमंत तांबे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा