अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
शासकीय कामकाजात अडथळा; बारामती नगरपरिषदेसमोर गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
9
3
0
4
1
बारामती: बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. सार्वजनिक मार्ग रोखणे, पूर्वपरवानगीशिवाय फलक लावणे आणि प्रभारी मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ॲड. अमर सातकर आणि त्यांच्या इतर चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रभारी मुख्याधिकारी अजय मोहन निगळे हे नगरपरिषद कार्यालयात शासकीय कामकाज करत होते. त्यावेळी ॲड.अमर सातकर व त्यांचे चार साथीदार बॅनर व वाहनांसह नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांनी प्रवेशद्वारासमोर फलक व वाहने उभी करून नागरिकांच्या ये-जा करण्यात तसेच कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच, घोषणाबाजी करत मुख्याधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घातला, अपशब्द वापरले आणि मारहाणीचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ४१५/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २१४, १३२, २२२, २७७, २७२, २८० व २९१ यांसह महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५, मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे करत आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नक्कीच आहे; मात्र या अधिकाराच्या नावाखाली शासकीय कामकाजात अडथळा आणणे, सार्वजनिक मार्ग रोखणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे किंवा कायदा स्वतःच्या हातात घेणे खपवून घेतले जाणार नाही. मतभेद कितीही तीव्र असले तरी ते सनदशीर आणि लोकशाही मार्गानेच व्यक्त करावेत. कायद्याचे पालन करणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नेहमीच आदर केला जाईल, परंतु शासकीय कामात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.



