सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, आतापर्यंतच्या कलानुसार ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने साडेसात ते आठ हजार मतांची मोठी आघाडी घेतली आहे. सभासदांनी विद्यमान चेअरमनचा निर्णय नाकारला असून, या निवडणुकीत २१-० असा एकतर्फी विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास कारखान्याचे माजी चेअरमन राज्यवर्धन दादा शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सुरू असलेल्या मतमोजणी दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना राज्यवर्धन शिंदे म्हणाले की, अजित दादा गेल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून असे ठरवले होते की, यावर्षीचा विजय हा अजित दादांना समर्पित करायचा. परंतु, विद्यमान चेअरमन साहेबांनी हा निर्णय बदलला आणि त्यांनी स्वतःचा वेगळा निर्णय घेतला. चेअरमन साहेबांचा हा निर्णय कारखान्याच्या सभासदांना अजिबात पटला नाही. हीच वस्तुस्थिती वहिनीसाहेब आणि सर्व सहकाऱ्यांनी सभासदांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली.
सभासदांना ही बाब पटवून देण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले, आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मतमोजणीत हे मोठे यश आणि आघाडी पाहायला मिळत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सभासदांनी अतिशय कष्ट घेऊन या पॅनलच्या उमेदवारांना मतदान केल्याचेही ते म्हणाले. सध्या ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’चे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर असून २१-० असा निकाल होईल का, या विचारलेल्या प्रश्नावर अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर देताना राजवर्धन शिंदे म्हणाले की, १०० टक्के २१-० असाच निकाल लागणार आहे. मतमोजणी अद्याप सुरू असली तरी, कल पाहता एकप्रकारे हा निकाल २१-० असाच झाला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा