शिक्रापूर : आधी गोड बोलून विश्वास जिंकला, नंतर सोन्याच्या बिस्कीटाचे आमिष दाखवले आणि संधी साधून महिलेचे तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र, गुन्ह्यातील आरोपी सीसीटीव्हीच्या नजरेतून सुटू शकला नाही. शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत थेट बीड गाठून फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला जेरबंद केले.

तसेच त्याच्याकडून फसवणूक झालेले ४.५० लाख रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने शंभर टक्के हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा. पिठ्ठी निरगुडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सविस्तर घटना अशी की, २८ सप्टेंबर रोजी नंदा दरेकर या नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी खंडाळे येथे जात होत्या. शिक्रापूरच्या चाकण चौकात त्या वाहनाची वाट पाहत थांबल्या असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी गोड बोलण्यास सुरुवात केली. बोलता बोलता त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना आपल्या मागे येण्यास सांगितले. दरेकर यांना चाकण चौकातून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सुपर बाजाराजवळील एका झाडाखाली नेण्यात आले.
तेथे बोलण्याच्या ओघात आरोपीने त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या कट करून आणि गळ्यातील सोन्याची पानपोत काढून घेतली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या हातात सोन्यासारखे दिसणारे एक पितळेचे बिस्कीट ठेवले आणि हे तुमच्या सोन्यापेक्षा जास्त वजनाचे आहे, असे सांगून तेथून पोबारा केला. आरोपी निघून गेल्यानंतर दरेकर यांनी बिस्कीट पाहिले असता ते सोन्याचे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी दुसऱ्या दिवशी शिक्रापूर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. फुटेजमधून आरोपीचा माग काढत शिक्रापूर पोलिसांचे पथक थेट बीड जिल्ह्यात पोहोचले आणि अभिमान तुपे याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक सोन्याची पानपोत असे तीन तोळे सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यात आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून त्याचाही शोध सध्या सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार व शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस फौजदार लहानु बांगर, पोलिस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे व शिवाजी चितारे यांच्या पथकाने केली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा