Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिरूरमधील घरफोडीचा पर्दाफाश: पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; १८.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

१. शिरूरमधील बीएसएनएल ऑफिस आणि बंद घराच्या चोरीची उकल. २. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि सासवड पोलिसांची संयुक्त कारवाई. ३. तीन सराईत चोरटे जेरबंद; १२१ ग्रॅम सोने आणि २०० ग्रॅम चांदी जप्त. ४. एकूण १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

0 8 6 1 7 7

पुणे : शिरूर परिसरातील घरफोडी आणि चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तीन सराईत चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण १८,५०,०००/- (अठरा लाख पन्नास हजार) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिनांक १२ जुलै २०२६ रोजी शिरूर येथील स्टेट बँक कॉलनीमधील बीएसएनएल (BSNL) कंपनीच्या ऑफिसचे लॉक तोडून आतून फ्रेमचे मदरबोर्ड व पीसीबी चोरीला गेले होते. तसेच, याच दिवशी वाडा कॉलनी, शिरूर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३), (४) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. ६४९/२०२६) दाखल करण्यात आला होता.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व तपासी पथकांना विशेष मार्गदर्शन केले होते. या अनुषंगाने, गुन्ह्याची पद्धत, सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती देण्यात आली.
सदर घरफोडी करणारे आरोपी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लासुर्णे भागात असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सासवड पोलिसांच्या मदतीने लासुर्णे भागात सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. सुरज भिमा निंबाळकर (रा. डोरलेवाडी, ता. बारामती)
२. शंकर तायप्पा घोरपडे (रा. लासुर्णे, वेदवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे)
३. संगम लाला शिंदे (रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे)

पोलिसी खाक्या दाखवताच या तिन्ही आरोपींनी शिरूर येथील घरफोडीची कबुली दिली. त्यांनी चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने ज्या ठिकाणी लपवून ठेवले होते, तेथून पोलिसांनी पंचनाम्याद्वारे सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत (मॅजिस्ट्रेट कस्टडी) असून, त्यांनी या गुन्ह्यात इतर साथीदारांची मदत घेतल्याचेही कबूल केले आहे. त्यामुळे फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र भासले व श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सपोनि सुधीर वाळुंज आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतरपणे सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे