बारामती : एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आणि नंतर बलात्कार व ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका टोळीवर बारामती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी हे एका शासकीय विभागात अधिकारी असून बारामती येथील एका प्रशिक्षण केंद्रात ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून येत असत. तिथेच त्यांची ओळख काही व्यक्तींशी झाली. याच ओळखीचा फायदा घेत एका महिलेने त्यांना वारंवार व्हिडिओ कॉल करून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने अधिकाऱ्याने तिचा नंबर ब्लॉक केला, मात्र दुसऱ्या नंबरवरून संपर्क साधून हे जाळे अधिक घट्ट करण्यात आले.
आरोपींनी अधिकाऱ्यासोबतच्या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले होते. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सुरुवातीला “५० लाख रुपयांची” मागणी करण्यात आली. तडजोड करत ही रक्कम १० लाखांपर्यंत खाली आणली गेली. दरम्यान, आरोपींनी फिर्यादीकडून “१ लाख रुपये” जबरदस्तीने उकळले होते.
“जर पैसे दिले नाहीत, तर तुमच्यावर बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करू, तुमची नोकरी घालवू आणि समाजात बदनामी करू,” अशा धमक्या आरोपींकडून देण्यात आल्या होत्या.
फिर्यादी यांनी धीर न खचता पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्याकडे असलेल्या iPhone मध्ये कॉल रेकॉर्डिंग नसल्याने त्यांनी हुशारीने दुसऱ्या फोनवरून आरोपींच्या धमकीवजा संभाषणाचे ऑडिओ-व्हिज्युअल रेकॉर्डिंग केले. हे पुरावे तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपास करत सर्व डिजिटल पुराव्यांचा ‘हॅश व्हॅल्यू’ पंचनामा केला असून, आरोपींच्या आवाजाची पडताळणी (FSL Voice Comparison) केली जाणार आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
* अपरिचित व्यक्तींशी सोशल मीडिया किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क टाळावा.
* हनी ट्रॅप किंवा ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
* कायद्याच्या भीतीपोटी गुन्हेगारांना पैसे देऊन त्यांचे धाडस वाढवू नका.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा